" सूर्य दिसत राहील तोपर्यंत.." च्या तिसऱ्या आवृत्तीचं होणार प्रकाशन

Edited by:
Published on: November 29, 2024 11:12 AM
views 108  views

मुंबई : वंदना प्रकाशन मुंबईच्या वतीने डॉ. सुनील सावंत यांच्या " सूर्य दिसत राहील तोपर्यंत....." काव्य संग्रहाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. ह्या काव्य संग्रहात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील वर्तमानाच्या भेदक कविता आणि विश्वातील व महानगरातील भयंकर वास्तवाच्या मानवतावादी कविता समस्त मानव जातीला अंतर्मुख करतील, अशी प्रस्तावना कविवर्य मंगेश पाडगांवकर व कविवर्य नारायण सुर्वे यांनी २००१ मध्ये दिली आहे.

डॉ. सुनील सावंत यांची एकूण २१ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित असून त्यात ५ मराठी काव्य संग्रह, २ मराठी कथा संग्रह, १ मराठी अनुवादित ललित लेख संग्रह, १ मराठी आध्यात्मिक पुस्तक, ४ मराठी संपादित काव्यसंग्रह, १ मराठी संपादित चरित्रात्मक पुस्तक, त्यांच्या ५ काव्य संग्रह्यातील मराठी कवितांवर आधारित १ समीक्षा ग्रंथ, १ मराठी अनुवादित आध्यात्मिक ग्रंथ, १ हिंदी काव्य संग्रह, १ हिंदी आध्यात्मिक पुस्तक, १ हिंदी शोध ग्रंथ, १ इंग्लिश संपादित ललित पुस्तक व १ मराठी कादंबरीचा इंग्लिश भावानुवाद अशी पुस्तके आहेत.

डॉ. सुनील सावंत यांच्या " सूर्य दिसत राहील तोपर्यंत....." काव्य संग्रहाची तिसरी आवृत्ती शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ३.३० वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, वा. वा. गोखले सभागृह, पहिला मजला, यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुला जवळ, जे.के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई - ४०० ०१६ येथे वंदना प्रकाशन  प्रकाशित करणार आहे. 

समारंभाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी संसद सदस्य व माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ आणि समारंभाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व श्री. राजीव श्रीखंडे, जागतिक साहित्याचे अभ्यासक, सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. रमेश कोटस्थाने व हिंदी साहित्यिक डॉ बीरेंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत ह्या काव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. हा सोहळा सगळ्या रसिकांसाठी निःशुल्क असून रसिकांनी ह्या समारंभाचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजक वंदना प्रकाशन, मुंबई  यांनी केली आहे.