ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांची खळी गजबजली

आदित्य ठाकरेंनी उर्जा आणली
Edited by:
Published on: November 23, 2023 17:43 PM
views 860  views

सावंतवाडी : युवासेना प्रमुख, शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीतील ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी माजी उपसभापती चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या खळा बैठकीत उपस्थित राहत पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत कासार यांच्या माजगाव येथील निवासस्थानी सर्वप्रथम आदित्य ठाकरे उपस्थित राहिले आणि त्यानंतर मायकल डिसोजा यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या खळा बैठकीत आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला. येत्या ३१ डिसेंबरला हे खोके सरकार पडणार म्हणजे पडणार असा दावा त्यांनी येथे केले. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपूर्वी आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करावा असा आदेश दिलाय. संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे सरकार पूर्णतः बेकायदेशीर आहे. या राज्यात हे सरकार सत्तेवर आल्यामुळे लोकशाहीचा खूनच झालाय. त्यामुळे हे घटनाबाह्य सरकार पडणे खूप गरजेचे आहे असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. या खळा बैठकीला खासदार विनायक राऊत, आ. वैभव नाईक, युवासेना सचिव

वरुण सरदेसाई, शैलेश परब, अतुल रावराणे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा तसेच ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, खळा बैठकीत बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोळचा उल्लेख केला. कोकण, कोकणी माणूस आणि इथल्या निसर्ग संपन्न वातावरणाबद्दल ते बोलत होते. देवगड पाठथरवाडी येथे त्यांच आजोळ आहे. याबद्दल विचारल असता मामाच्या गावी जायला आवडतं. मात्र, आज दौरा अन नियोजित कार्यक्रम असल्यानं इच्छा असून देखील ते शक्य नाही आहे असं ते म्हणाले.