अडचणीच्या काळात गॅरेज व्यावसायिकांची सामाजिक बांधिलकी मोलाची

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 21, 2024 11:41 AM
views 190  views

कुडाळ : गॅरेज व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी कुडाळ तालुका टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. अडचणीच्या काळात गॅरेज व्यावसायिक सामाजिक बांधिलकी मोलाची ठरते. विविध महामंडळे तसेच बँकांच्या अनेक कर्ज योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी गॅरेज व्यावसायिकांनी प्रस्ताव करावेत. सर्व बँका तुमच्यासाठी सदैव तत्पर आहेत. व्यावसायिक कर्ज तसेच मुलांच्या शिक्षणासाठी बँकांचे कर्ज मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडिया अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक मुकेश मेश्राम यांनी टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशनच्या स्नेहमेळाव्यात केले.

कुडाळ तालुका टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशन सिंधुदुर्गचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच श्री भवानी मंगल कार्यालय, पिंगुळी काळेपाणी येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक (बॅक ऑफ इंडिया) मुकेश मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला तहसीलदार अमोल पाठक, आरसेटीचे संचालक राजाराम परब, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्गचे अमोल पाडावे, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक सचिन रनीत, टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष संदिप तेंडोलकर, सेक्रेटरी गुरूनाथ धुरी, खजिनदार दिपक रांजणकर, उपाध्यक्ष वैभव सुतार,माजी अध्यक्ष आनंद पेडणेकर, अरूण शेलटे आदिंसह असोसिएशनचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील टु व्हिलर गॅरेज व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. मेश्राम यांनी बँकिंग च्या विविध व्यावसायिक कर्जविषयक योजनांचा गॅरेज व्यावसायिकांनी लाभ घ्यावा याबाबत सखोल मार्गदर्शन करीत, यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासित केले तसेच गॅरेज व्यावसायिकांच्या बँकिंग बाबतच्या समस्या जाणून घेत त्यांचे निरसन केले. सरपंच श्री.आकेरकर म्हणाले, या टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचे कार्य चांगले आहे. संघटनेचा उद्देश, नियम, अटी, शर्ती चांगल्या आहेत. यातूनच हे असोसिएशन मोठ्या उंचीवर पोचेल. सर्व मेकॅनिक व्यवसायातून चांगली ओळख निर्माण करत आहात हे कौतुकास्पद आहे. या व्यावसायिकांसाठी आज अनेक कर्जविषयक योजना आहेत, परंतू त्या कागदावरच राहातात. बँकांनी कर्ज योजनेत लवचिकता आणावी आणि व्यावसायिकांना कर्ज सुलभरित्या मिळवून द्यावे, तरच त्या योजनांचा उद्देश सार्थकी ठरेल आणि व्यावसायिकांना फायदा होईल. शालेय मुलांचा असोसिएशनने गौरव केला हा कौटुंबिक सत्कार आहे. मुलांनी मोठ्या पदांपर्यंत यश संपादन करावे, असे आवाहन करीत, असोसिएशनच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाचे कौतुक केले.

तहसिलदार अमोल पाठक यांनी असोसिएशनच्या कार्याचा गौरव केला. जिल्हा उद्योग केंद्राचे अमोल पाडावे यांनी मुख्यमंत्री रोजगार योजनेची माहीती दिली. या योजनेअंतर्गत 1064 एवढे उद्दीष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे. आतापर्यंत 360 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यात कर्जासाठी 20 लाख मर्यादा आहे. यासह व्यवसायासाठी अनेक योजना आहेत. या योजनांचा गॅरेज व्यावसायिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आरसेटीचे संचालक राजाराम परब म्हणाले, ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण केंद्र (आरसेटी) च्या माध्यमातून टु व्हिलर मेकॅनिक प्रशिक्षण दिले जाते. याचा फायदा जिल्ह्यातील तरूणांनी घ्यावा. तरूणांनी स्वयंरोजगार करण्यासाठी पुढे यावे. अशाप्रकारचा स्वयंरोजगार करून स्वकर्तृत्वावर उभे राहावे. महामंडळाच्या विविध विभागाच्या योजना आहेत. त्याचा फायदा घ्यावा. काही अडचणी आल्या तर कधीही सांगा. आम्ही सहकार्यासाठी त्वरित आहोत, अशी ग्वाही त्यांनी गॅरेज व्यावसायिकांना दिली. तर व्यवसायासाठी आर्थिक मदतीसाठी आमची बँक व आम्ही सदैव तत्पर आहोत, असे युनियन बँकेचे व्यवस्थापक सचिन रनीत यांनी सांगितले.

यावेळी गॅरेज व्यवसायिकांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये चिन्मय संतोष गवंडे, शौर्या शंकर सातार्डेकर, विराज अनंत नाईक, विराज संदेश गावकर, अथर्व गुरूनाथ धुरी, विनोद नित्यानंद परब, अनाम रियाज शेख, सायना राजाराम म्हापणकर, रविराज विश्वनाथ परब, मृण्मयी दिपक रांजणकर, गौरिश गजानन शिरोडकर, निरंका दशरथ आडेकर, युतिका गजानन पालव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेचे अध्यक्ष संदिप तेंडोलकर, सेक्रेटरी गुरूनाथ धुरी, खजिनदार दिपक रांजणकर, विकास अपराध, अरूण शेलटे, मोहित मेथर यांच्यासह कणकवली, बांदा व जिल्ह्यातील अन्य पदाधिकार्‍यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष संदीप तेंडोलकर, स्वागत सेक्रेटरी गुरूनाथ धुरी यांनी केले. सुत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे, कोकण इतर मागासवर्ग, आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत विविध योजनांची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.