
दोडामार्ग : दोडामार्ग - बांदा मार्गालगतच्या दोन्ही बाजूचे गटार गायब झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचा फायदा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हे गटार खुले करावे अशी मागणी आता सर्व सामान्य नागरिक व वाहन चालकामधून होत आहे.
अवकाळी सुरु झालेल्या पावसाने सार्वजनिक बांधकामचा कारभार चव्हाट्यावर आणलाय. दोडामार्ग तालुक्यासह शहराच्या ठिकाणी ही गटारातील पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसाने काल दोन दिवसापासून काहीशी विश्रांती घेतली आहे. याचा फायदा आता तरी बांधकाम विभागाने घेऊन दोडामार्ग शहरासहित संपूर्ण तालुक्यातील रस्त्याच्या बाजूचे गटार खुले करावे, जेणेकरून सुरु होणाऱ्या मान्सून मध्ये तरी नागरिकांना याचा त्रास होणार नाही.
जीवन प्राधिकरण - एमएनजीएलचा गैर कारभार
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमएनजीएल या दोन्ही कंपन्यानी आयी, दोडामार्ग, बांदा मार्ग पूर्णपणे पोखरून ठेवला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम करून या कंपन्यांनी पाईपलाईन टाकली आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गटार या कंपन्यांनी चोरी केल्यामुळे या मार्गावर ठीकठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. काही ठिकाणी तर रात्याचे काही भाग खचले व दबले असल्यामुळे वाहन चालवताना ही कसरत करावी लागते. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांनी केलेले बोगस काम हे चव्हाट्यावर आले आहे. या कामाची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
आडाळी MIDC च्या रस्त्याचा चिखल रस्त्यावर
दोडामार्ग बांदा मार्गावर कळणे मायनिंगच्या नजिक आडाळी एमआयडीसीत जाण्यासाठी रस्ता काढण्यात आला आहे. मात्र हा रस्त्याचा चिखल, माती मुख्य राज्यमार्गावर येत असल्याने त्याचाही नाहक त्रास वाहनचालकांना होत आहे. तरी MIDC विभागाने हा चिखल बाजूला करावा अशी मागणी केली जातं आहे.