तिलारी घाटातील अपघातांच सत्र सुरूच

Edited by: संदीप देसाई
Published on: January 19, 2024 14:12 PM
views 589  views

दोडामार्ग : अवघड असलेल्या तिलारी घाटातील अपघातांच सत्र सुरूच असून पुन्हा एकदा या घाटात लोखंडाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाला तब्बल एक तासांनी बाहेर काढून अधिक उपचारासाठी चंदगड येथे हलविण्यात आले.  मात्र या निमित्ताने अवजड वाहनांची तिलारी घाटातील वाहतूक मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  

गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर असा  जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात अवजड वाहने चालविण्यास बंदी असताना या घाटातून सुरू असलेल्या अवजड वाहनांमुळे अपघात होऊन घाट बंद होणेसारख्या घटना सतत घडत आहेत. शुक्रवारी सकाळी तिलारी घाटातून लोखंडी सामान भरलेले वाहन घाट उतरून खाली येत असताना मध्यभागी ब्रेक निकामी झाले.

त्यामुळे वाहन पलटी होऊन चालक केबिनमध्ये अडकून पडला. मात्र या अपघातात लोखंडी सामान केबिन मध्ये आल्याने  वाहन चालकाच्या शरिराला लागून तो जखमी झाला. अखेर या मार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनचालक, पोलिस व ग्रामस्थांनी त्या चालकाची सुटका करून त्याला जखमी अवस्थेत चंदगड ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. मात्र चंदगड बांधकाम विभाग या मार्गावरील वाहतूक निर्धोक राखण्यात अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.