अपघातांची मालिका सुरूच ; सार्वजनिक बांधकाम झोपेतच !

ग्रामस्थांची नाराजी ; तातडीच्या उपाययोजनेची मागणी !
Edited by: विनायक गांवस
Published on: July 22, 2025 18:02 PM
views 822  views

सावंतवाडी : माडखोल बुर्डीपुल येथील धोकादायक वळणावर चिरे वाहतूक करणार्‍या ट्रकला अपघात झाला. वळणावरील रस्ता खचल्यामुळे हा अपघात झाला. वारंवार अपघात होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागा सुशेगाद असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, यापुढे अपघात होवू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माडखोल बुर्डी पुलावर असलेल्या धोकादायक वळणावरील रस्ता खचला आहे. रस्त्याला लागूनच झाडी असल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी येत असल्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सार्वजनिक बांधकामच दुर्लक्ष होत असल्याने आठवडा भरात तीन अपघात घडलेत. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. परंतू, भविष्यात होणारे अपघात लक्षात घेता त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्यावी, बॅरीकेट लावावे अशी मागणी माडखोलचे माजी सरपंच संजय शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते शुभम हिर्लेकर यांनी केले आहे.

श्री हिर्लेकर म्हणाले, वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गावर सिनेमा गृहाच्या ठीकाणी जाणार्‍या मुख्य रस्त्यावरील पुल खचला आहे. त्या ठिकाणी कधीही मोठा अपघात होवू शकतो. मात्र, बांधकाम विभाग झोपेत आहे. डांबराची पिंपे रस्त्यात उभी करण्यात आली आहे‌‌. त्यामुळे प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालावा अशी मागणी त्यांनी केली आहे.