
सावंतवाडी : समाजात जाती-धर्मामध्ये क्लेश, वादविवाद निर्माण होत असताना संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकोबा, जनाबाई या थोर संतांचे विचार आज समाजाला तारू शकतील. ज्याच्या पायावर सर्व धर्म व जातीच्या लोकांनी डोकं ठेवावं असा समानतेने पाहणारा एकमेव देव म्हणजे पंढरीचा विठोबा आहे. हीच पंढरीच्या विठुरायाची वारकरी संत परंपरा, समता, बंधुभाव आजच्या विखुरलेल्या समाजाने आत्मसात करायला हवी, असे मत संत साहित्य अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी येथे व्यक्त केले.
श्रीराम वाचन मंदिरतर्फे आयोजित जयानंद मठकर व्याख्यानमालेत ‘वारकरी परंपरा आणि इतिहास’ या विषयावर समारोप पुष्पात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक वीरधवल परब होते. यावेळी वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे, प्रा. डॉ. जी. ए. बुवा, संचालक राजेश मोंडकर आदी उपस्थित होते. डॉ. श्रीरंग गायकवाड पुढे म्हणाले, तेराव्या शतकात संत परंपरेची चळवळ संत नामदेव यांनी उभी केली. या शतकात कर्मकांड वाढले होते. संत नामदेव यांनी कन्याकुमारी ते अफगाणिस्तानापर्यंत चळवळ उभी केली. संत गोरा कुंभार, सावता माळी, संत एकनाथ, संत तुकाराम, ज्ञानोबा यांनी समाजाला कर्मकांडातून बाहेर काढले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात संत नामदेवांचे कार्य होते. संत एकनाथांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांनी जाती, धर्मभेद बाजूला सारत संत परंपरा पुढे नेण्याचे काम केले. वाळवंटात कष्टकरी, गोरगरीब शेतकरी यांना त्यांचे डोके ज्याच्या पायावर ठेवता येइंल, असा एकमेव देव म्हणजे विठोबा. पंढरीच्या वाळवंटात त्याने समतेचा, एकोप्याचा विचार दिला. उत्तरेतून गोकुळात नांदत असलेल्या श्रीकृष्णाने विठोबाच्या रूपात अवतार घेत वाळवंटात पंढरीत आपले स्थान निर्माण केले. श्रीकृष्ण आणि विठोबा हे एकच रूप आहे. आज पंढरपूरला आषाढी एकादशीनंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. यावरून दोन्ही रूपे एक आहेत, हे स्पष्ट होते.
आज समाजव्यवस्थेत जाती-धर्मामध्ये क्लेश, द्वेष निर्माण होत आहेत. हा संत आमच्या समाजाचा, हा त्या समाजाचा असे म्हटले जाते. मात्र, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, सावता माळी, एकनाथ महाराज हे सर्व धर्मसमभाव पाळणारे होते. संत नामदेव यांच्यायासोबत जनाबाईंनी संतपरंपरेची चळवळ खांद्यावर घेतली. जनाबाई, मुक्ताबाई यांच्यावर खरंतर महाकादंबरी, चित्रपट व्हायला हवा, असे कार्य आहे.
आज चित्रपट, नाटकांमधून ओवी, गीते गायली जातात. पण ती महिनाभरापुरता आपल्या तोंडी राहतात. पण कित्येक दशकांपूर्वीच्या ओव्या, अभंग आजही आपल्या मुखी आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदाय, अभंग, ओवी जोपर्यंत आपल्या ओठी आहेत, तोवर कितीही प्रयत्न केला तरी समाज दुभंगणार नाही. आषाढी, कार्तिकीची पंढरपूरची वारी, वारकरी संतांचे साहित्य व कीर्तन परंपरा यामधून मराठी संस्कृती आणि मानसिकता यांची जडणघडण होत गेली आहे. ही चळवळ केवळ अध्यात्म आणि भक्तीमार्गाच्या प्रसारापुरती मर्यादित नव्हती. लोकजागर, समाज प्रबोधन, समता-बंधुत्व-मानवता यांसारख्या शाश्वत मानवी मूल्यांची रुजवण अशा गोष्टींसाठीही ती महत्वाची होती, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर आपण स्वीकारलेल्या लोकशाही संविधानामध्येही हीच मूल्ये ठळक असल्याचे दिसून येते. गांधी, आंबेडकर, साने गुरुजी, विनोबा अशा राष्ट्रीय नेत्यांनाही वारकरी चळवळीच्या साहित्याने प्रभावित केले. हा वारकरी संप्रदाय आज समता अन् बंधुभावाचा संदेश देत आहे. त्यामुळे जाती-धर्मामध्ये द्वेष निर्माण केले गेले तरी त्यांचा हा डाव सफल होणार नाही असेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. गोविंद काजरेकर, उषा परब, ॲड. अरुण पणदूरकर, सुभाष गोवेकर, मधुकर मातोंडकर, डॉ. दीपक तुपकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राजेश मोंडकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांनी केले. आभार ॲड. संदीप निंबाळकर यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने श्रोते उपस्थित होते.