
दोडामार्ग : तालुक्यातील पाल पुनर्वसन येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा ( कुडासे खुर्द ) येथील शाळेच्या एका वर्गाचे छप्पर अचानक कोसळले. ही घटना दुपारी जेवणाच्या वेळी १.१५ वा. च्या दरम्यान घडल्याने तसेच सुदैवाने विद्यार्थी वर्गात नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र असे असले तरी अशा धोकादायक इमारतीत मुलांना बसविणे अत्यंत धोकादायक असल्याने पालक सध्या चिंतेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाल पुनर्वसन येथील या शाळेची इमारतही तिलारी पाटबंधारे विभागाने १९९३ साली बांधली आहे. ही शाळा बांधून जवळपास ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. इमारतीचे छप्पर पूर्णतः कमकुवत बनलेले आहे. आज सोमवारी दुपारी १.१५ वा. च्या दरम्यान अचानक इयत्ता ४ थी च्या वर्गातील छप्पराच्या स्लॅपचा काही भाग अचानक कोसळला. दुपारची वेळ असल्याने व विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजनाची वेळ झाल्याने सर्व मुले शाळेच्या वरांड्यात बसून जेवत होती. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली . यावेळी केंद्रप्रमुख राजलक्ष्मी लोंढे यांनीही शाळेला भेट देत संपूर्ण माहिती जाणून घेतली. व या संदर्भात तसा अहवाल गटशिक्षण विभागाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी पाल पुनर्वसन येथे धाव घेत शाळेला भेट दिली. यावेळी गवस यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती घेत आवश्यक त्या सूचना शिक्षण विभागाला करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच सदरची असलेली इमारत निर्लेखित करून त्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी आवश्यक तो प्रयत्न मंत्री केसरकर यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी स्पष्ट केले. तसेच तोपर्यंत दुसऱ्या वर्ग खोलीत मुलांची बसण्याची व्यवस्था करण्यात यावी असेही मुख्याध्यापक यांना सांगितले.
इमारत निर्लेखित करून नवी बांधावी : राजन गवस
दरम्यान आज जी घटना घडली यात देवाच्या कृपेने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या शाळेला साधारण आज 30 वर्षे झाली. गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीला गळती लागली होती. शिक्षण विभागाला वारंवार कळवून पत्रव्यवहार करून याकडे दुर्लक्ष झाला. आता आमची एवढीच मागणी की सदरची शाळा ही नव्याने इमारत बांधण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आवश्यक तो निधी द्यावा. तसेच सध्या याच शाळेत एक वर्ग खोली सुस्थितीत आहे. त्या खोलीत मुलांना बसवीण्यासाठी आम्ही शाळा व्यवस्थापन समिती व पालक निर्णय घेणार आहोत असे उपसरपंच राजन गवस म्हणाले. यावेळी सरपंच श्रद्धा नाईक, शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष लक्ष्मण गवस, विद्यमान अध्यक्ष सूरत शिरसाठ, शिवसेना उपतालुका प्रमुख मायकल लोबो, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, झोळंबे माजी सरपंच राजेश गवस, ग्रामपंचायत सदस्य अमिता राणे यांसह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.