
सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलावाची उपजिल्हा रुग्णालयासमोरील १ कोटी ९३ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली रिटर्निंग वॉल ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा धोकादायक बनल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे. निष्काळजीपणामुळे पुन्हा हा कठडा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मत त्यांनी व्यक्त केल.
मोती तलावाची कोसळलेली भिंत कोट्यवधी रुपये खर्च करून पुन्हा बांधण्यात आली. परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ती पुन्हा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिटर्निंग वॉल ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी पावसाच्या दोन दिवसाच्या पाण्यातच खचून तळ्याच्या कठडा खचत आहे. मोठ्या पावसाच्या पाण्यात तो पुन्हा कोसळण्याची शक्यता असल्याने त्वरित याकडे नगरपालिका व बांधकाम विभागाने लक्ष घालून खचलेल्या ठिकाणी भर घालून घ्यावा. जेणेकरून तो कठडा पुन्हा कोसळणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ज्या ठिकाणी कठडा खचलेला आहे त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात यावे. कुठच्याही प्रकारचा अपघात होऊन मनुष्यहानी अथवा वित्त आणि होऊ नये अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे. त्या ठिकाणी दोन दिवसात भर न टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला.
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी तालुका उपाध्यक्ष बावतिस फर्नांडिस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू राकेश नेवगी, फिरोज खान आदी उपस्थित होते.