
कुडाळ : कुडाळ तालुक्यात, रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर लक्ष वेधून घेणारे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. राणे बस थांबा, हमरमळा आणि बेताबंबर्डे येथे लावलेल्या या बॅनरवर "आपण चंद्रावर प्रवास करत आहात, जरा सांभाळून, रस्ता हरवला आहे, प्रशासन झोपलय" असा उपरोधिक संदेश लिहिलेला आहे. हे बॅनर वाचून स्थानिक नागरिक प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
रस्त्यांची चाळण आणि नागरिकांचा रोष
ज्या रस्त्यांसाठी जनता नियमितपणे कर भरते, त्याच रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जागोजागी पडलेले मोठे खड्डे वाहनचालकांसाठी आणि प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहेत. हे खड्डे कमी असल्याचा दावा करत, काही नागरिकांनी रस्त्यांची तुलना चक्क चंद्रावरील पृष्ठभागाशी केली आहे. या बॅनरमुळे प्रशासनाला रस्त्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नावालाच दुरुस्तीची कामे
या बॅनरमुळे प्रशासनाची झोप उडेल अशी आशा असतानाच, परिस्थिती काहीशी वेगळी असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले तरी, ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. केवळ खडी आणि काळी ग्रिट वापरून खड्डे बुजवले जात आहेत. कामावर असलेल्या मजुरांना सिमेंटबद्दल विचारले असता, त्यांनी गाडीमध्ये सिमेंट असल्याचे सांगितले. मात्र, तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या रस्त्यासाठी केवळ तीन सिमेंटच्या पिशव्या दिसल्या. यावरून केवळ 'काम करायचं म्हणून करायचं' या पद्धतीने काम सुरू असल्याचं स्पष्ट होतं.
या निकृष्ट कामामुळे ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने, जनतेमधून संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी लावलेले हे बॅनर प्रशासनाला खऱ्या अर्थाने जागे करतील आणि रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघात वाढण्याची भीती आहे.
प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन, रस्त्यांची दुरुस्ती दर्जेदार करावी, अशी अपेक्षा जनता व्यक्त करत आहे. या बॅनरमुळे तरी प्रशासनाला जाग येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.










