मळगाव घाटीतील रस्ता धोकादायक !

पं. स. सदस्य जितेंद्र गांवकर यांचा आक्रमक पवित्रा
Edited by: विनायक गांवस
Published on: May 14, 2026 15:43 PM
views 29  views

  • प्रशासनाला 8 दिवसांत कारवाई करण्याचा इशारा

सावंतवाडी : सावंतवाडी-रेडी राज्यमार्गावरील मळगाव घाटी ते डी. के. टुरिझम हॉलपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून गेल्या महिनाभरात येथे अपघातांची मालिका सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संरक्षक भिंती आणि गार्ड रेलिंग तुटलेल्या अवस्थेत असून एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली असून माजगाव पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला येत्या आठ दिवसांत कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.

मळगाव घाटीतील रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. तुटलेली रेलिंग आणि संरक्षक भिंतींमुळे अपघात होत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. पावसाळा तोंडावर आला असतानाही विभाग सुस्त आहे. पंचायत समिती सभेत विषय मांडूनही दुर्लक्ष केल्याने श्री. गांवकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला‌. आज श्री. गावकर यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदन देत तातडीने संरक्षक भिंतींची दुरुस्ती करून नवीन गार्ड रेलिंग बसवणे, रस्त्यालगत असलेली धोकादायक झाडे तोडून रस्ता सुरक्षित करणे, वेग-मर्यादा फलक आणि रिफ्लेक्टर बसवणे,गटारांमधील कचरा साफ करणे, कचरा टाकणाऱ्यांवर बंदी घालणे आणि घाटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशा मागण्या केल्या आहेत. यावेळी श्री. गांवकर म्हणाले, पंचायत समितीच्या मासिक विशेष सभेतही आम्ही हा प्रश्न लावून धरला होता. मात्र, प्रशासनाकडून फक्त आश्वासनं मिळत. जर आठ दिवसांत यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही, तर आम्हाला तीव्र जनआंदोलन छेडावे लागेल," असा इशारा जितू गांवकर यांनी दिला आहे. यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, लक्ष्मण नाईक, गणेश प्रसाद पेडणेकर, ज्ञानेश्वर सावंत, बाबुराव तेंडुलकर, मंदार सावंत, रिचर्ड डिमेलो आदी उपस्थित होते.