
कणकवली : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी केवळ महसूल यंत्रणा किंवा तालुकास्तरापुरती मर्यादित नाही. गावपातळीवरही आवश्यक उपाययोजना तातडीने होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींनी टॉर्च, कटर, लाईफ जॅकेट, दोरखंड यांसारखे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते. काही विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत संबंधितांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचेही श्री. कातकर यांनी स्पष्ट केले.
बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. आवश्यक ठिकाणी साईड पट्ट्यांची कामे, रम्बलर बसविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे तसेच धोकादायक झाडांच्या फांद्या व बॅनर हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नडगिवे येथे रम्बलर बसविण्याचे काम सुरू असून कणकवलीतही लवकरच ते करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कासार्डे ओव्हरब्रिजवरील कोसळलेल्या प्लास्टरबाबतही आवश्यक कार्यवाहीच्या सूचना करण्यात आल्या.
पावसाळ्यात शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पाणी शुद्धीकरणाबाबत ग्रामपंचायत विभागाला सूचना देण्यात आल्या. तसेच जीर्ण अवस्थेतील शाळांची तातडीने दुरुस्ती किंवा निर्लेखन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. परिस्थितीमुळे धोका निर्माण होऊ शकणाऱ्या शाळांबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना घरी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याची गरज नसल्याचे श्री. कातकर यांनी सांगितले.
आपत्तीच्या काळात ग्रामपंचायतींनी प्रथम प्रतिसाद देणे आवश्यक असून तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय किंवा पोलीस यंत्रणेची भूमिका समन्वय साधण्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
महावितरणच्या आढाव्यात अलीकडील वादळी पावसामुळे खारेपाटण व चिंचवली परिसरातील खंडित वीजपुरवठ्याबाबत चर्चा झाली. अशा परिस्थितीत तातडीने अपडेट देणे, आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढविणे आणि त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या. बीएसएनएलच्या यवतेश्वर येथील टॉवरसाठी जागा निश्चित नसल्याने तो सुरू होऊ शकलेला नसल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
कृषी विभागाच्या आढाव्यात मंडळ स्तरावर पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याची माहिती देण्यात आली. फोंडाघाट येथील स्वयंचलित पर्जन्यमापकासाठी नवीन जागेचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालयातील औषधसाठा आणि साथीच्या रोगांवरील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.
कणकवली शहरातील गटार सफाई आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. शहरातील ४० गटारांपैकी २६ गटारांची कामे पूर्ण झाली असून रस्त्यांवरील बहुतांश खड्डे बुजविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अगम यांनी दिली. आचरा रोडवरील खड्ड्यांचे काम अद्याप बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्थितीत पुलावर किंवा मोऱ्यांवर पाणी साचल्यास वाहने रोखण्यासाठी पोलिसांनी वेळेत बॅरिकेटिंग करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईची वेळ कोणावरही येऊ नये यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करून यंत्रणा सतर्क ठेवावी, असे निर्देश प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिले.











