
चिपळूण : यंदाच्या गणेशोत्सवाचा जल्लोष पार पडल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. मंगळवारी गणपती बाप्पांचे विसर्जन पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी मुंबई-पुण्यातून आलेल्या चाकरमान्यांनी परंपरेप्रमाणे तिखटाचा सण साजरा केला. मात्र, यंदा गौरीपूजनानंतर लगेच सोमवार व मंगळवार आल्याने अनेकांना योग्य पद्धतीने तिखटाचा सण करता आला नाही. त्यामुळे बुधवारी हा सण साजरा केल्यानंतर चाकरमानी आता परतीला लागले आहेत.
लाखोंच्या संख्येने कोकणात आलेल्या चाकरमान्यांमुळे गणेशोत्सव उत्साहात पार पडला. यावर्षी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, परतीच्या प्रवासामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. बुधवारी रात्री सात वाजल्यानंतर चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस ते बहादूर शेख नाका या दरम्यान महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालक या कोंडीत अडकून पडले. खाजगी गाड्या, बसेस, तसेच चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीचा ताण वाढला.
चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून जादा गाड्या, तसेच चिपळूण ते पनवेल अशा मेमो गाड्या सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय एसटी महामंडळाच्या हजारो गाड्याही फेऱ्या मारत आहेत. तरीदेखील खाजगी वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळता आली नाही. चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही मोठ्या प्रमाणात एसटी बसेस सोडल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे शहरात आणि महामार्गावर काही तास कोंडी कायम राहिली.