मयुरी गावडेची मुंबई पोलीस दलात निवड

तळवणे गावची पहिली महिला पोलीस कर्मचारी
Edited by: विनायक गांवस
Published on: May 16, 2026 16:12 PM
views 163  views

सावंतवाडी :  तळवणे माऊली टेम वाडी येथील मयुरी दत्ताराम गावडे हिची मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर निवड झाली आहे. मयुरीच्या या यशामुळे तळवणे गावाला पहिली महिला पोलीस कर्मचारी मिळण्याचा बहुमान मिळाला असून, संपूर्ण गावातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल मयुरीचा ग्रामस्थांच्यावतीने शाल आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रयत्न केले, तर त्या कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात, हेच मयुरीने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. तिच्या या यशाने तळवणे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मयुरीच्या या यशाची दखल घेत तळवणे ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद शशिकांत केरकर आणि पंचायत समिती सदस्य नेहा नारायण कांबळी यांच्यावतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तिला शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार सोहळ्याला परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये तळवणे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा तालुका अध्यक्ष सिद्धेश कांबळी, ग्रामपंचायत सदस्य सावळाराम घाटये, भाजपा बांदा मंडळ सरचिटणीस नारायण कांबळी, तळवणे गावचे माजी उपसरपंच आबा बर्डे, तसेच किशोर गावडे, विजय गावडे यांच्यासह गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मयुरी गावडे हिच्या या यशाबद्दल केवळ तळवणे गावातच नव्हे, तर संपूर्ण बांदा परिसरातून तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात असून, ती आगामी काळात इतर तरुण-तरुणींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.