
सिंधुदुर्गनगरी : महाबोधी महाविहार बोधगया याचे व्यवस्थापन बौद्धांना द्यावे त्याचबरोबर मोहू जन्मभूमी स्मारक तसेच नागपूर दीक्षाभूमी यांचे व्यवस्थापन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडे द्यावे अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बिहार मुख्यमंत्री, महाराष्ट्र मुख्यमंत्री तसेच मध्यप्रदेश मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा तसेच बौद्ध महासभा भीमशक्ती संघटनांच्या वतीने आज शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर ,सुषमा हरकुळकर, वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर,बौद्ध सेवा संघ सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, प्रेरणा भूमी समिती सदस्य ममता जाधव, सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्र राज्य निमंत्रक सुदीप कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, बौद्ध समाजाला बोधगया मंदिराचा संपूर्ण धार्मिक हक्क मिळावा. महू (मध्यप्रदेश) येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे व्यवस्थापन त्यांच्या विचारांच्या विरोधी पद्धतीने न होता डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभेकडे सोपवावे.
तसेच, नागपूर दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बौद्ध महासभेकडे द्यावे आणि चालू असलेले विभाजन तातडीने थांबवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.










