प्रश्न शिक्षणाचा, पुढाकार ठाकरेंच्या शिवसेनेचा ; सपोर्ट चाकरमानी उद्योजकांचा

Edited by: संदीप देसाई
Published on: June 22, 2023 18:41 PM
views 84  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून तब्बल १३ शाळा शून्य शिक्षकी आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या शिलेदारांच्या मदतीतुन व प्रयत्नातून अनेक शाळात शिक्षण सेवक नेमून या शाळा सुरू ठेवण्याचे खडतर काम सुरू आहे. या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या प्रयत्नाला आता स्थानिक मात्र उद्योगधंद्या निमित्त बाहेरगावी असलेले ग्रामस्थ साथ देत आहेत, अश्याच प्रयत्नातून पुणे स्थित असलेले भिकेकोनाळ गावचे रहिवाशी उद्योजक सुरेश गवस यांनी या उपक्रमाला मोठा सपोर्ट केला असून त्यांनी कुंब्रल शाळा न. ०३ येथे नेमलेल्या शिक्षणसेवकाचे २५००० रु मानधन आपण देण्याची जबाबदारी उचलली आहे, अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकारांना दिली आहे.


श्री. धुरी यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले आहे की, सुरेश गवस हे पुणेस्थित आहेत. मात्र त्यांचे मुळगाव भिकेकोनाळ आहे. त्यांनी शिक्षणाविषयी तळमळ व्यक्त करताना आम्ही लहान होतो त्यावेळी पैसा नव्हता. मात्र आता कुणाला मदत करू शकतो एवढी शक्ती देवाने दिली आहे. माझ्या गावातील तालुक्यातील मुले पैशाअभावी अशिक्षित राहता कामा नये, यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही देत शिवसेनेच्या या प्रयत्नांना सपोर्ट केला आहे. त्याबद्दल श्री. धुरी यांनी उद्योजक सुरेश गवस यांचे आभार मानले आहेत.