वनविभागाकडून सावंतवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान

Edited by:
Published on: November 23, 2023 21:17 PM
views 535  views

सावंतवाडी : सावंतवाडी मधील जुनाबाजारातील करोलवाडा येथे नाल्यामधील जाळीत अडकलेल्या अजगराची सुटका करून त्याला जीवदान दिले. सावंतवाडी येथील करोलवाडा येथे राहणाऱ्या सलीम करोल यांना आज दुपारच्या दरम्यान त्यांच्या घराशेजारून वाहणाऱ्या नाल्यामध्ये एक अजगर जाळीत अडकला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब वनविभागाच्या कार्यकायात याबाबत कळविले. त्यानुसार सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनरक्षक रमेश पाटील व वन सहाय्यक बबन रेडकर यांची रेस्क्यू टीम तात्काळ जागेवर दाखल झाली.

जागेवर पाहिले असता नाल्याच्या तोंडावर लावण्यात आलेल्या नायलॉन जाळीमध्ये अंदाजे 7 फूट लांबीचा अजगर अडकला असल्याचे दिसून आले. अजगराने स्वतःभोवती नायलॉनची जाळी वेटोळे घालून घट्ट गुंडाळून घेतली होती. त्यामुळे ती जाळी आजगराला कचून जखम होण्याची शक्यता होती. शेवटी ती नायलॉन जाळी कटरच्या सहाय्याने कापून वनविभागाच्या रेस्क्यू टीमने आजगराची सुखरूप सुटका केली.

सुटका केलेल्या अजगराला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वन विभागाच्या कार्यालयात वेळेवर याबाबत माहिती दिल्याबद्दल सलीम करोल यांचे वन विभागाकडून आभार मानण्यात आले. हे रेस्क्यू ऑपरेशन उपवनसंरक्षक सावंतवाडी एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनरक्षक रमेश पाटील, वनसहाय्यक बबन रेडकर, रामदास जंगले, देवेंद्र सावंत यांनी पार पाडली.