कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच !

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थी उपोषणावर ठाम
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 07, 2023 13:26 PM
views 249  views

दापोली : "परत द्या परत द्या, आमचा हक्क परत द्या..!" अशा घोषणा देत दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. एमपीएससी अभ्यासक्रमात झालेल्या बदलाचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थी उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

दापोली कोकण कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे २५ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू आहे. अद्याप त्यांचे आंदोलनाची कोणतीही दखल शासनाने आणि आयोगाने घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे.

सध्या महाराष्ट्रात जो संविधानिक पदाचा गैरवापर होत असल्याचे सांगून त्याचा निषेधही करण्यात आला. कृषी अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषी सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत आहे. हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबवावे आणि या दोन्ही परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी, राज्यांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करावी, मृत व जलसंधारण विभागांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ पासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा, अशा मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे हे धरणे आंदोलन सुरू झाले आहे, आंदोलन सुरू होऊन पंधरा दिवस झाले, तरी त्याची दखल घेण्यात आलेली नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.