
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळून पुढे जाणारा एमएच ६६ महामार्ग अत्यंत खराब अवस्थेत असल्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सिंधुदुर्गनगरी ते कुडाळ, तसेच कुडाळ ते नेरूर या प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यानंतर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. या मार्गावरून जिल्ह्यातील दळणवळण मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता अपघातांचा धोका वाढला आहे.
जिल्हाभरातून स्थानिकासह दररोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करत असून त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तातडीने रस्त्याचे दुरुस्ती काम न झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करेल, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.










