जानवली अपघातातील कार ताब्यात..!

चालकावर गुन्हा दाखल | शिरगाव चेक पोस्टवर कार पकडली
Edited by:
Published on: December 15, 2023 12:45 PM
views 926  views

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर जानवली रतांबी व्हाळ येथे परबवाडी फाटा नजीक सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात इनोव्हा कारसह चालकाला गुरुवारी रात्री उशिरा शिरगाव चेक पोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले. मृत अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक अवधूत मनोहर धुवाळी (रा. जामसंडे,ता.देवगड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पसार झालेली इनोव्हा कार (MH-07 Q-7894) कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

जानवली येथे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी  अज्ञात कारने अंजली साळवी यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच कणकवली पोलिसांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला घटनेची माहिती देत अज्ञात कार बाबत सूचना केली होती. जानवली येथे अपघात घडल्यानंतर सदर अपघातग्रस्त कारसह चालकाने घटनस्थळावरून धूम ठोकली होती.

शिरगाव चेकपोस्टवर सदर इनोव्हा कार आली तेव्हा ऑन ड्युटी एएसआय प्रमोद डगरे याना इनोव्हाच्या दर्शनी डावा भाग तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने संशय आला. डगरे यांनी चालकाकडे चौकशी केली असता चालक धुवाळी याने चिरे भरलेल्या ट्रकने इनोव्हा कारला ठोकल्याची विसंगत माहिती दिली.

प्रमोद डगरे यांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक श्री. बगळे याना कल्पना दिली. सदर कार जानवली येथील अपघातात असल्याची शंका आली. त्यानुसार चालक अवधूत धुवाळी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने जानवली येथे दुचाकीला ठोकून घाबरून आपण घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री कारचालकासह कार कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आली. सदर इनोव्हा कार जामसंडे येथील रुमडे यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.