हरवलेले घर कोणी शोधून देत का ?

ज्येष्ठ नागरिकाची करुण व्यथा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 11, 2025 20:05 PM
views 90  views

कुडाळ : मुंबईमध्ये वास्तव्य करणारे ज्येष्ठ नागरिक प्रदीप जयसिंग राणे यांना गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी, आणाव, येथे आल्यावर धक्का बसला. वडिलोपार्जित घराच्या जागी दुसरेच बांधकाम सुरू असल्याचे त्यांना आढळले. अधिक चौकशी केली असता, हे बांधकाम त्यांच्या पुतण्यानेच केले असल्याचे समजले.

या प्रकाराची तक्रार करण्यासाठी प्रदीप राणे यांनी ग्रामपंचायत गाठली आणि आपल्या घराच्या म्हणजेच घर नंबर ६११ ची घरपट्टी भरली. पण धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामपंचायतीने दिलेल्या घरपट्टीची पावती असतानाही जागेवरून घर मात्र गायब होते!

ग्रामपंचायतीने सुरुवातीला २४ तासांत घर शोधून देण्याचे आश्वासन दिले, पण नंतर त्यांना १५ दिवसांची मुदत मागितली. १९७० सालापासून असलेले घर अचानक कुठे गेले, याचा शोध घेताना राणे यांना धक्कादायक सत्य समोर आले.

राणे यांच्या मते, त्यांच्या वडिलांच्या घराच्या जागेवरच त्यांच्या पुतण्याला 'घरकुल आवास योजनेतून' मंजूर झालेले घर बांधण्यात आले आहे. शासकीय योजना मंजूर करताना ग्रामपंचायतीने जागेची खातरजमा का केली नाही, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

प्रदीप राणे यांनी प्रशासनाकडे त्यांच्या हरवलेल्या घराची नोंद घेऊन संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने आणाव गावात एकच चर्चा सुरू झाली आहे.