
वेंगुर्ला : 'मन चंगा तो कठोती मे गंगा' हे जीवन जगण्याचे सर्वोत्तम तत्त्वज्ञान देणारे, संत रोहिदास १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे रहस्यवादी कवी होते. रोहिदासांच्या भक्ती गीतांचा भक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यात कायमच प्रभाव राहिला आहे. जीवन जगण्याचे सर्वोत्तम तत्वज्ञान व मानवतावादासाठी आवश्यक असलेले साहित्य संत रोहिदासांनी निर्माण केले, असे प्रतिपादन असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी शिरोडा - बांधवाडी (ता. वेंगुर्ला) येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
आसोली येथील संत रोहिदास उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनंत आसोलकर, सचिव कृष्णा चव्हाण, खजिनदार प्रा. प्रतिभा चव्हाण, वेंगुर्ला तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष उत्तम आर्लेकर, भाजप प्रणित एससी समाजाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष महेश चव्हाण, अनिल चव्हाण, बबन शिरोडकर, यज्ञकांत शिरोडकर, बाबल चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले की, जगातील संत रोहिदास हे एकमेव संत आहेत की, ज्यांना १६ नावांनी विविध राज्यात ओळखले जाते. त्यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशात झाला असला तरी कर्माने ते संपूर्ण विश्वाचे झाले.
"कृस्न, करीम, राम, हरी, राघव, जब लग एक न पेखा!
वेद कतेब कुराण, पुराणन, सहज एक नहि देखा!"
अशा अनेक दोह्यांतून त्यांनी विश्वाला मानवतावादाची शिकवण दिली. म्हणून आजही संत रोहिदासांचे तत्वज्ञान चिरंतन प्रेरक आहे. मनुष्य कोणत्या जातीत जन्मला त्यापेक्षा त्याने कर्म कसे केले? यावरून त्याची ओळख होत असते. ही शिकवण आजही मानवतेला लागू पडते, असे महान विचार त्यांच्या साहित्यातून मिळतात. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला 'द अनटचेबल' हा ग्रंथ त्यांना समर्पित केला, असेही प्रा. पाटील म्हणाले.
प्रास्ताविक सादर करताना प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी सांगितले की, संत रोहिदास म्हणजे जात, वर्ण, द्वेष यांच्या पलीकडे संपूर्ण मानव एक मानणारे आणि मानवतावादाचा पुरस्कार करणारे थोर संत होते. म्हणूनच त्यांच्या विचारांना केवळ जातीपातीत न बांधता अखिल मानवतेसाठी ते गरजेचे आहेत.
यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अनंत आसोलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास बांधकरवाडीच्या नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती लाभली. यावेळी आप्पा चव्हाण, उर्मिला चव्हाण, विद्याधर शिरोडकर, अपर्णा चव्हाण, सोनाली चव्हाण यांच्यासह युवा वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कृष्णा चव्हाण यांनी केले.