
सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव धाकोरा परिसरातील प्रस्तावित मायनिंग आणण्याचे कार्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याचे काही जण भासवत आहेत. मात्र ही माहिती पूर्णतः चुकीची आहे. कारण, जेव्हा येथे मायनिंगचे होणार अशी माहिती कळविण्यात आली होती त्यावेळी आम्ही सर्व धाकोरा परिसरातील सुज्ञ जनतेने मंत्री दीपक केसरकर यांना भेटून निवेदन दिले आहे. त्याचवेळी मंत्री केसरकर यांनी "आपल्याला नको असलेला प्रकल्प आपण कधीही होऊ देणार नाही ! असे आम्हाला आश्वासित केले आहे. त्यामुळे "मी हे करेन, ते करेन", असे सांगणारे फक्त आता येथील सुज्ञ जनतेला आश्वासने देत फिरत आहेत. हे साफ चुकीचे आहे. उलटपक्षी मंत्री केसरकर यांनी आजगाव आणि धाकोरा या गावांना निवेदनाद्वारे जीजी मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. किंबहुना विकास कामे केली सुद्धा आहेत. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणून येथील जनता भूलथापांना बळी पडणार नाही असे धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
दरम्यान, ज्या राजन तेली यांनी धाकोरावासीयांना खोटे बोलून जी माहिती सांगितली त्या राजन तेली यांनी कळणे मायनिंगमध्ये तुमच्या मशिनरी भाड्याला ठेऊन किती बक्कळ पैसा कमावला याची धाकोरा ग्रामस्थांना माहिती आहे. राजन तेली हे पीडब्ल्यूडी ची कामे बाऊन्सर वापरून मॅनेज करतात याचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आम्ही पुरवू शकतो असा टोला त्यांनी लगावला. येथील विरोधकांना सोबत घेऊन राजन तेली हे केवळ आपली राजकीय इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी आश्वासने देत असून आजपर्यंत त्यांनी आपल्या गावासाठी काय केले?, येथील विकासासाठी किती निधी आणला?, हे त्यांनी सांगावे. अन्यथा दीपक केसरकर यांनी केलेली आजपर्यंतची मदत आम्ही जनतेला सांगू तेही पुराव्यानिशी असा टोला सरपंच स्नेहा मुळीक यांनी लगावला आहे.