
खेड : आठ ते दहा वर्ष बंद अवस्थेत असलेले खेडमधील गरम पाण्याचे कुंड हे मागच्या वर्षी स्वच्छ करून जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते मात्र आता हे कुंड सध्या पुन्हा दुरावस्थेत दिसत आहे. गेल्याच वर्षी महाराजा प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने हे गरम पाण्याचे कुंड , खेड शहरवासिय आणि पर्यटकांना बघण्यासारखे ठिकाण म्हणूून उपलब्ध करून दिले होते. खेड नगरपरिषदेला हे कुंड सांभाळता आलं नाही,परंतु यावर्षी दहा वर्षांपूर्वीची जी स्थिती होती तशीच परिस्थिती या ऐतिहासिक कुंडाची पुन्हा निर्माण झाली आहे.
अशी गबाळ परिस्थिती निर्माण व्हायला कारणीभूत खेड नगरपरिषदेच्या प्रशासनाचे दुर्लक्ष आहे . या गोष्टीकडे प्रशासनाने ताबडतोब लक्ष देऊन व स्वच्छता करून हे कुंड पुन्हा सुसज्ज करून खेड शहरातील जनतेला व पर्यटकांना उपलब्ध करून द्यावे तसेच खेड नगरपरिषदेने १२ ऑगस्टपर्यंत काही ठोस कारवाई करून, हे ऐतिहासिक कुंड सुसज्ज अवस्थेत जनतेसाठी उपलब्ध करून न दिल्यास दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी तहसीलदार कार्यालय खेड येथे दुर्ग सेवक व महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुस्कर यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन महाराजा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व सल्लागार निखिल जामसंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे. या प्रसंगी दुर्ग सेवक व महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुस्कर, किरण तायडे, दुर्ग सेवक , स्वराज गांधी,नरेद्र जाधव,अभिजीत मुंडेकर, आर्यन मापुस्कर आदी उपस्थित होते.