
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तथा पोलीस दलास हादरून टाकणाऱ्या, चक्क उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यास निलंबित होण्याची वेळ आणलेल्या घटनेचा सोमवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागला. पोटगीचा दावा मिटविण्यासाठी लाचेची मागणी करणारे सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विठ्ठल अण्णा जाधव यांची ओरोस जिल्हा न्यायालयाचे न्या. व्ही. एस देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. जाधव यांच्या वतीने ऍड. प्रकाश हिलगे यांनी काम पाहिले. ऍड. हिलगे यांना ऍड. तुषार शिंदे व ऍड. तेजस हिलगे यांनी सहकार्य केले.

ही घटना ३ मार्च ३०२४ सावंतवाडी शहरात घडली होती. घटनेतील तक्रारदार यांच्या भावावर त्याची पत्नी म्हणवून घेणाऱ्या एका महिलेने न्यायालयात पोटगी व घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी सदर महिलेची माहिती मिळण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी कार्यालयास अर्ज दाखल केला होता. त्यासंबंधी तक्रारदार व उपविभागीय पोलीस अधिकारी विठ्ठल जाधव यांच्यामध्ये संबंधित महिलेविषयी चर्चा झाली. त्यानंतर ती महिला व तक्रारदार यांचा भाऊ यांच्यामध्ये परस्पर तडजोड करून पोटगीचा दावा मिटवण्यासाठी पोलीस अधिकारी जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे वीस लाख रुपयांची मागणी केली. त्यामध्ये पंधरा लाख रुपये त्या महिलेस व पाच लाख रुपये आपणाला ठेवणार असल्याचे जाधव यांनी तक्रारदार यांना सांगितले होते, अशी माहिती तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबाग येथे पोलीस उपअधीक्षक सुनील कलंगुटकर यांना दिली होती.
त्यानुसार अँटी करप्शन ब्युरो यांच्या पथकाने जाधव यांना सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंध कायदा सन १९८८ चे कलम ७,१३,(९)डी सह १३ (2२)प्रमाणे अटक केली होती. २७ दिवस न्यायालयीन कोचडी भोगल्यानंतर जाधव यांना जामीन मंजूर झाला होता. ऍड. प्रकाश हिलगे यांच्यासह ऍड. तुषार शिंदे व ऍड. तेजस हिलगे यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जाधव यांची निर्दोष मुक्तता केली.










