
सावंतवाडी : पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. मात्र करीयर म्हणून त्याचा स्विकार केल्यास कठोर परिश्रम आणि अनेक गोष्टीचा त्याग करण्याची आपली तयारी पाहिजे, तरच या क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकता, असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा एबीपी माझाचे असोसिएट एडिटर राहुल खिचडी यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून तात्काळ माहितीची देवाण-घेवास होण्यास मदत झाली आहे. मात्र गैरप्रकार टाळण्यासाठी हा मीडिया कायद्याच्या चौकटीत बसवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर अभ्यासक्रम केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा अंतर्गत पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. खिचडी हे आज या ठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा उलगडा केला.
यावेळी केंद्राचे प्रमुख तथा पत्रकार राजेश मोंडकर, अमोल टेंबकर, सिद्धेश सावंत, शुभम धुरी, पत्रकार रुपेश पाटील, विनायक गावस, निखिल माळकर, भगवान शेलटे, अनुजा कुडतरकर, प्रल्हाद मांजरेकर,विजय पाताडे, संदीप राठोड, वैष्णवी सावंत, प्रसन्ना सोनुर्लेकर आदींसह पत्रकारितेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
श्री. खिचडी म्हणाले, पत्रकारितेत प्रयोगशीलता महत्त्वाची असते. काळानुसार त्यात बदल करता आले पाहिजेत. प्रिंट मीडियापासून सुरू झालेल्या पत्रकारितेचा प्रवास आता सोशल मीडियापर्यंत आला आहे. आज सोशल मीडियामुळे प्रत्येक जण पत्रकार बनला आहे. कारण सोशल मीडियाच्या आधारे एखादी बातमी आज कोणीही प्रसारित करू शकतो. मात्र खऱ्या पत्रकारांनी त्यातील विश्वासाहर्ता जपणे आवश्यक आहे. तीच त्यांची ओळख आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पत्रकारितेत निवेदक म्हणून करिअर करताना आवाज जपण्यासाठी मेहनत घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी सादरीकरणातील बारकावे लक्षात घ्यावे लागतात. आवाजातील चढ-उतारावर नियंत्रण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सादरीकरण हे मनापासून केले पाहिजे. आपल्या सादरीकरणात कुठेही कृत्रिमतेचा आभास होता कामा नये, याची खबरदारी घ्यावी. कारण जे आपण मनापासून मांडतो तेच वाचकांना आवडत असतं, या सर्व गोष्टी बारकाईने लक्षात घेतल्यास आणि त्याला मेहनतीची जोड दिल्यास, नक्कीच तुम्ही पत्रकारितेत यशस्वी करिअर करू शकता, असा विश्वासही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.