
गुहागर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुहागर विधानसभा मतदारसंघात, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रमोद गांधी यांची उमेदवारी फायनल झाली आहे. मात्र महायुतीचा उमेदवार अजून निश्चित होत नाही.
या मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी जोरदार तयारी सुरू केली होती. महायुतीला विजयाची खात्री वाटत नसल्याने निर्णय अजुन गुलदस्त्यात आहे. अशातच गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची मागणी पालकमंत्री उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र गुहागर मतदारसंघात डॉ.नातू यांच्या सहकार्याशिवाय उमेदवारी जाहीर करणे महायुतीला परवडणार नाही. नगर पंचायत निवडणुकीत, गुहागर शहरविकास आघाडीचा खेेळलेल्या डावासारखा, वेगळा डाव यावेळी गुहागर विधानसभेसाठीही डॉ. विनय नातू टाकतील आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठे यश मिळेल अशी खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांना वाटते. म्हणूनच शिंदेंचे निकटवर्तीय, ठाणे येथील रवींद्र फाटक हे ठाणे येथुन खास डॉ. विनय नातू यांची
भेट घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी गुरुवारी गुहागर दौऱ्यावर आले होते. त्यांंनी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील नातू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली.यावेळी रवींद्र फाटक यांच्यासोबत शिवसेनेचे गुहागर तालुक्यातील पदाधिकारीही उपस्थित होते. रवींद्र फाटक यांनी नातू यांना सहकार्य करण्याची विनंती केली असून आपण एकमेकांना सहकार्य करून ही जागा निवडून आणन्यासाठी चर्चा या बैठकीत झाली आहे.रवींद्र फाटक आणि गुहागर तालुक्यातील शिवसेना शिंदेगटाचे पदाधिकारी यांची विनय नातूंसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.या बैठकीनंतर राजेश बेंडल यांच्या नावावर, महायुतीचा उमेदवार म्हणून अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे.
याच मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून खासदार श्रीकांत शिंदेचे मेहुणे विपुल कदमही इच्छुक होते. आता त्यांंचे नावही मागे पडले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी, आम्ही गुहागरचा उमेदवार विमानातून घेऊन येऊ, असं सांगून मतदारसंघाची उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे आता पालकमंत्री उदय सामंत दौऱ्यावर असून ते आता पुन्हा येताना राजेश बेंडल यांना विमानातून घेऊन येतील अशी चर्चा गुहागरातून आहे.