उपजिल्हा रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारींची नगराध्यक्षांनी घेतली दखल

रुग्णालय प्रशासनाची तातडीची बैठक
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2026 14:00 PM
views 68  views

पाणीपुरवठा - स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश 

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्षांनी रुग्णालय प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर भर रुग्णालयाच्या इमारतीवर  व आजूबाजूला वाढलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ तोडणे आणि परिसराची संपूर्ण साफसफाई सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका विभाग यांनी समन्वय करून लवकरच साफसफाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

या बैठकीत नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सर्व सभापती व भाजपचे नगरसेवक, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, रुग्णालय प्रशासन, डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे सदस्य आणि नगरपालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत रुग्णालयातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करून, पाण्याचे मागील सर्व थकीत देयके भरून घ्यावी मग त्यावरील थकीत व्याज माफ करून मिळावे या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल व त्यानंतरच नवीन हवे असणारे नळ कनेक्शन रुग्णालयाला दिले जातील, असा आदेश नगराध्यक्षांनी रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत, जेणेकरून पाणीपुरवठा सुरळीत होईल. रुग्णसेवेसाठी नवीन सुविधा, रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून रुग्णालयात २ ते ३ बाक (बेंचेस) बसवले जाणार आहेत. तसेच, पोस्टमार्टम रूमसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्यास, सध्याच्या रूमचे नूतनीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रुग्णालयाच्या बाहेर पथदिवे बसवण्यासाठी लवकरच अंदाजपत्रक सादर करावे असे सर्वजनिक बांधकाम विभागच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.  या सर्व कामाची नगराध्यक्षा स्वतः पालकमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

प्रलंबित देयके आणि निवासस्थाने

रुग्णालयातील अपुऱ्या व्हीलचेअरची कमतरता दूर करण्यासाठी रुग्णालयाने डिपीडीसीमध्ये मागणी केली आहे. आधीच्या वेंडरची थकीत बिले लवकरच अदा करून केली जातील असे डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी मुद्दे स्पष्ट केले.‌या सर्व गोष्टीचा पाठपुरावा केला जाईल. डॉक्टरांसाठी नवीन निवासस्थाने उभारण्याबाबतही विशेष तरतूद केली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.