
वैभववाडी : रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरून पसार होणारा चोरटा वैभववाडी रेल्वे स्थानकातील रिक्षाचालकांच्या सतर्कतेमुळे सापडला. या संशयित चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा संशयित चोरटा उत्तरप्रदेश येथील असून राजू असं त्यांचं नाव आहे. ही घटना शुक्रवारी घडली.
मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हॉलीडे स्पेशल या गाडीने चव्हाण नामक प्रवासी प्रवास करीत होते. प्रवासात झोपलेले असताना संशयित चोरट्याने श्री. चव्हाण यांच्या खिशातून मोबाईल चोरला. वैभववाडी स्थानकात गाडी थांबवल्यावर तो गाडीतून उतरून थेट रिक्षा थांब्यावर आला. याठिकाणी असणाऱ्या रिक्षा चालकांकडे सीम काढण्यासाठी पीन मागू लागला .रिक्षा चालकांना त्याच्याकडे बघून संशय आला. त्यांनी त्याच्याकडे असलेला मोबाईल मागितला तर त्याने तो देण्यास टाळाटाळ केली .याच दरम्यान मोबाईलवर फोन आला.त्यावेळी मराठी रिंगटोन वाजली. त्यामुळे रिक्षा चालकांचा संशय आणखी वाढला. त्यांनी त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. फोनवर आलेला कॉल त्यांनी उचला तर त्यावेळी समोरून मोबाईलचे मालक श्री चव्हाण हे बोलत होते. माझा फोन चोरीला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हा फोन या संशयिताने चोरल्याचे स्पष्ट झाले.
रिक्षाचालकांनी याबाबत वैभववाडी पोलीसांना तात्काळ माहिती दिली. पोलीसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. रिक्षाचालक अनिल कोकरे, प्रविण काडगे, सुरेश काळे, बाबू जंगम यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे हा संशयित चोरटा जेरबंद झाला. त्यांच्या कामगिरीच सर्वत्र कौतुक होत आहे.