'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने' बाबतचा सोशल मीडियावरील संदेश पुर्णपणे खोटा

अशी कोणतीही योजना नाही | फसव्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 17, 2025 21:30 PM
views 145  views

सिंधुदुर्गनगरी : 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' या नावाने सोशल मीडियावर प्रसारित  होत असलेला संदेश पूर्णपणे खोटा असून, महिला व बाल विकास विभागाकडून अशी कोणतीही योजना राबविण्यात येत नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा फसव्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशी योजना असल्याचे भासवून समाजमाध्यमांद्वारे काही संदेश प्रसारित होत आहेत. असे वृत्त केवळ अफवा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणुकीला बळी पडू नये. या प्रकारच्या फसव्या संदेशांमध्ये दि. १ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील २ मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा ४ हजार रुपये मिळणार आहेत व त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असा मजकूर प्रसारित करण्यात येत आहे. अशी कोणतीही योजना नसून त्यास बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.