'गावरहाठी' पुरस्कृत समन्वय समितीची सभा उत्साहात संपन्न !

चौकुळ येथे जमला गावप्रमुखांचा मेळा.
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 24, 2023 19:08 PM
views 419  views

सावंतवाडी : गावरहाठी पुरस्कृत समन्वय समितीची सभा चौकुळ येथे उत्साहात संपन्न झाली. या सभेला ४० गावांतील देवस्थानाचे मानकरी, गावचालक, प्रमुख ग्रामस्त उपस्थित होते. यावेळी 'गावरहाठी' संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कोणत्याही गावात मानावरून भांडण तंटे असतील तर ते तंटे समन्वय समितीच्या माध्यमातून मिटवावेत, व गावातील रूढी, परंपरा, सणोत्सव आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत व आपली संस्कृती टिकवावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

पूर्वजांनी घालून दिलेली गावरहाठी युवा पिढीला समजावी, मंदिरांची स्थापना करत असताना व 'बारस' करत असतांना त्यांच्या प्रथा, परंपरा कशा आहेत?, अलिखित स्वरुपातील रूढी पुढे संक्रमित झाल्या पाहिजेत. म्हणून समन्वय समितीच्या वतीने दरवर्षी अशा सभा आयोजित केल्या जातात. चौकुळ गावातील ही आठवी सभा होती. यापूर्वी आंबोली, माडखोल, फणसवडे, उबडे उपवडे, गेळे, सांगेली, आंबेगांव या गावात सभा झाल्या होत्या.

समन्वय समितीचे सचिव भरत गावडे यांनी प्रास्ताविक मनोगतात गावरहाठी समन्वय समितीचे महत्त्व सांगितले. चौकुळ गावाच्या वतीने आलेल्या मानकऱ्यांचे, गावचालकांचे, ढोल-ताशाच्या गजरात 'औक्षण' करून स्वागत करण्यात आले. यावेळी बरीच मंडळी पारंपारिक गणवेशात उपस्थित होती. या सभेस गजानन गावडे, शशिकांत गावडे, रूपा धुरी, पंढरी राऊळ, सुरेश गवस, आनंद मोर्ये, बाळा गावडे, ज्ञानेश्वर परब, भरत गावडे, गोविंद लिंगवत यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान समन्वय समितीच्या वतीने २५ वर्षे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेल्या अशोक गावडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गजानन गावडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. गावातील तंटे गावातच मिटविण्याची चौकुळ गावची आदर्श परंपरा इतरांनीही जपावी असे  बावा गावडे यांनी सांगितले.

यावेळी आंबोली, तेरवण, माडखोल, माणगांव, सातुळी, फणसवडे, आंबेगाव, कोलगाव, कुणकेरी,  आंबेरी, कालेली, वेर्ले, शिरशिंगे, देवसू, सांगेली, कुंभवडे, उपवडे, निवजे, इसापूर, कानूर, ओवळीये, दाणोली, तेरवण मेढे, हडपडे, दुकानवाड आदी गावांतील प्रमुख उपस्थितहोते. शेवटी बाबा गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले.