
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात एस.टी बस सेवेचा बोजवारा उडाला असून बसेस तीन तीन तास लेट सोडल्या जात असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगराध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष चेतन चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी येथील बस स्थानकात धडक देत वाहतूक नियंत्रकाना जाब विचारला. मात्र, हा सर्व प्रकार सावंतवाडी आगारातून होत असल्याचे वाहतूक नियंत्रक यांनी सांगताच तुम्ही तेथील स्थानिक नियंत्रक आहात त्यामुळे येथील समस्या तुम्हीच वरिष्ठांना कळवा, असे खडेबोल नगराध्यक्ष चव्हाण यांनी वाहतूक नियंत्रकांना सुनावले व सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.
दोडामार्ग तालुक्यात एसटी बसचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला होत आहे. एसटी बस उशिराने धावणे, तिकीट मशीन खराब होणे आदी समस्या असल्याने याचा जाब विचारण्यासाठी नगराध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष चेतन चव्हाण, माजी शहराध्यक्ष समीर रेडकर व पदाधिकारी यांनी येथील बस स्थानकाला धडक दिली. यावेळी वाहतूक नियंत्रण यांना या समस्यांबद्दल जाब विचारला. वाहतूक नियंत्रक यांनी सावंतवाडी आगारातून हा प्रकार होत असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले. आपण येथील वाहतूक नियंत्रक असून येथील समस्या वरिष्ठांना कळवा व या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढा. अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला.