रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा मंडणगड तहसीलवर धडकला

Edited by: मनोज पवार
Published on: December 19, 2024 18:24 PM
views 220  views

मंडणगड : परभणी येथील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी अमानुष मारहाण प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मंडणगड तालुक्याच्या वतीने दि. 19 डिसेंबर 2024 रोजी जोरदार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चादरम्यान निदर्शने व ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहापासून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मोर्च्याला सुरवात केली. शहरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत सुरु असलेल्या मोर्च्यात आंदोलनकर्त्यांनी उपरोक्त घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी शहरपरिसर दणाणून निघाला. तहसील कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलच्या पटांगणात ठिय्या मांडला. यावेळी मोठ्या प्रमाणत निदर्शने करण्यात आली. आरपीआयचे राज्य कार्यकारणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी आपल्या मनोगतातून याबाबत कार्यवाही न झाल्यास आणखी आक्रमक घेणार असल्याचे जाहीर केले. यावेळी करण्यात आलेल्या जोरदार निदर्शनानंतर तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी तहसीलदार यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन सादर केले. 

या मोर्चामध्ये आरपीआयचे राज्य कार्यकारणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, जिल्हा सरचिटणीस नगरसेवक आदेश मर्चंडे,  तालुकाध्यक्ष नागसेन तांबे, तालुका सचिव रामदास खैरे, किरण पवार, संदेश खैरे, विजय खैरे, जितेंद्र जाधव, भगवान खैरे, शंकर पवार, विनोद कवडे, संकेत तांबे, सचिन खैरे, सुमित पवार, संकेश कासारे, गौरव मर्चंडे, आकाश पवार, विधान पवार, सुशांत खैरे, मनोज पवार, मनोहर पवार, संदीप हाटे, प्रदीप हाटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी सादर केलेल्या निवेदनातील माहितीनुसार, परभणीतील पूर्णाकृती पुतळा परिसरात संविधान प्रतिकृती शिल्पाची 11 डिसेंबर 2024 रोजी एका समाजद्रोही व्यक्तीने तोडफोड करून विटंबना केली याच्या निषेधार्थ व या विरोधात परभणी येथील विविध सामाजिक संघटनाकडून आयोजित  निषेध मोर्चात पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी लाठीचार्ज केला, यामध्ये निष्पाप महिला पुरुष व युवकांना अमानुष मारहाण  केली. या मारहाणीमध्ये परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला. हि बाब माणुसकीला कलंकित करणारी असून महाराष्ट्र व देशासाठी नंदनीय आहे. तरी संविधानाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला व त्याच्या पाठीराख्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पोलिसांच्या मारहाणीमुळे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने सदर प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालून दोष पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.