जरांगेंच्या पाठीशी तळकोकणातील मराठा समाज..!

मुंबईत आंदोलनात होणार सहभागी : अँड. सुहास सावंत | मराठा उद्योग शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक दळवी
Edited by:
Published on: January 08, 2024 20:47 PM
views 220  views

सावंतवाडी : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज आंदोलन करत आहे. याला तळकोकणातून देखील पाठिंबा मिळत असून जरांगेंच्या या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०० गाड्या सहभागी होणार आहेत. कोकण देखील जरांगेंच्या मागे उभा आहे हे दाखवून द्यायच आहे असं मत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत यांनी व्यक्त केले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अँड. सुहास सावंत म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेकवेळा यशानं हुलकावणी दिली. २०२१ ला सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात मरगळ आली होती. आज जरांगे- पाटील यांनी आंदोलन करत लढा उभारल्यानंतर मराठा समाज पेटून उठला आहे. मुंबईत होणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी जाणार आहोत. त्यांच्यामुळे मराठा समाज एकत्र आला आहे. महाराष्ट्रासह कोकण देखील त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या आंदोलनात पनवेल येथे आम्ही सहभागी होणार आहोत. तर 'मराठा जोडो' अभियान आम्ही  सुरू करत आहोत असं ते म्हणाले.

 दरम्यान, मराठा कुणबी व कुणबी मराठा या नोंदी आपल्या जिल्ह्यात आहेत. याचे दाखले शासनाने लवकर द्यावेत, ही आकडेवारी शासनाने द्यावी. चौदाशे पेक्षा जास्त नोंदी ज्या सापडल्यात त्यांना दाखले द्यावेत अशी मागणी केली. तर मराठा आणि कुणबी यात फरक नाही. मराठा हाच कुणबी व कुणबी हाच मराठा आहे. गायकवाड आयोगाकडे आम्ही केलेल्या मागणीत मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण दिले जाव अशी मागणी केली होती असं त्यांनी यावेळी सांगितले. तर नोकऱ्यांच कमी होणार प्रमाण पाहता भविष्यात उद्योगाची कास धरल्याविना तरणोपाय नाही. यासाठी मराठा समाजाची उद्योग व व्यवसाय शाखा सुरू केली आहे. याच जिल्हाध्यक्षपद पुंडलिक दळवी यांना देण्यात आल आहे. ते गेली अनेक वर्षे उद्योग व व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत. अनुभवी असल्याने त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. पुंडलिक दळवी यांच पुष्पगुच्छ देऊन यावेळी समाजबांधवांनी अभिनंदन केलं. याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत, मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, नवनिर्वाचित उद्योग शाखा जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, अभिषेक सावंत, संजय लाड, राजन म्हापसेकर, श्री. राणे आदी उपस्थित होते.