बंगला बांधून देण्याचे आमिष ; 14 लाखांची फसवणूक

कणकवलीतील दोघांना अटक
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 27, 2023 12:08 PM
views 1235  views

कणकवली : कणकवली तालुक्यात जानवली येथे अंबर प्रकल्पांतर्गत २९ बंगले बांधले जाणार असल्याचे आमिष दाखवत शामल मंगेश तळदेवकर (रा.जानवली) यांची १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघाजणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी संशयित आरोपींचा सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळला होता.  गेल्या सहा महिन्यांपासून ते नजरेआड होते.  त्या चार  संशयित आरोपीपैकी तेजस सागर घाडीगावकर (३६, रा. भायखळा-मुंबई) आणि इल्टन पिटर नर्‍होना (३५, रा. वरळी-मुंबई) यांना कणकवली पोलिसांच्या पथकाने कोपरखैराणे,नवी मुंबई येथून शिताफिने ताब्यात घेत अटक केली आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान,  संशयितांनी आणखीही काही जणांची फसवणूक केली असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

या प्रकरणी फसवणूक झालेल्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ६ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल आहे. हे चारही जण अटकपूर्वक जामीनासाठी प्रथम जिल्हा न्यायालय, नंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यत गेले होते. सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर ते पोलिसांची नजर चुकविण्यासाठी संपूर्ण भारतभर फिरत होते. इकडे लोकांची फसवणूक करून मुंबईत शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. मुंबईत आणि सिंधुदुर्गातही त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात पुढे येत आहे. तक्रारदार शामल तळदेवकर यांच्याकडून बंगला बांधून देतो म्हणून सांगून संशयित आरोपींनी पैसे घेतले आणि बंगला बांधुन दिला नाही व पैसेही परत केले नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात केली होती. संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून कणकवली पोलिस उपनिरिक्षक अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे,  प्रणाली जाधव यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. त्यांना गुरूवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.