
कणकवली : कणकवली तालुक्यातील कोंडये येथे बिबट्या वाघाचा धुमाकूळ सुरूच असून सोमवारी सायंकाळी दोघांवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी तेथील ग्रामस्थ निलेश मेस्त्री, तुकाराम तेली, सिद्धेश मोडकर यांनी वन परिक्षेत्र अधिकारी श्री. गुणगीकर यांची भेट घेऊन तातडीने पकड मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वीपासून बिबट्याचा संचार कोंडये गावाच्या जंगलात सुरू आहे. विशेष म्हणजे या जंगलातूनच रस्ता असून करूळ हायस्कूलकडे जाणारी शाळकरी मुले चालत जातात. तसेच जंगलात जाणारे शेतकरी वर्ग कामाला जाणारे ग्रामस्थ याच मार्गावरून जात असतात. सुरुवातीला वनखात्याने पिंजरा लावला होता. परंतु बिबट्या सापडला नाही. गेले चार-पाच दिवस तो कुठे दिसला नव्हता. परंतु सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या दृष्टीस पडला. निलेश मेस्त्री, सिद्धेश मोडकर या युवा कार्यकर्त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीसाठी धाव घेतली. त्याचवेळी त्या बिबट्याने या दोघावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे तात्काळ मंगळवारी श्री. गुणगीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. शाळकरी मुले शाळेत जाण्यास घाबरत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याशिवाय कामावर जाणारे ग्रामस्थ जंगलात जाणारे शेतकरी हे सुद्धा कामापासून वंचित राहत आहेत. काजूचा हंगाम सुरू होणार असल्यामुळे बागेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना निर्भयपणे जाता यावे यासाठी हा बिबट्या पकडणे आवश्यक आहे. याला पकडण्यासाठी तातडीने मोहीम सुरू करावी व जोपर्यंत तो पकडला जात नाही तो पर्यंत पकड मोहीम थांबवू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी वन अधिकाऱ्यांनी जोवर बिबट्या पकडला जात नाही तोवर पकड मोहीम सुरू राहील असे आश्वासन दिले.