विहिरीत पडला बिबट्या

Edited by: मनोज पवार
Published on: October 05, 2024 09:53 AM
views 179  views

राजापूर : तालुक्यातील नाटे बांधकर वाडी येथे पहाटे पाचच्या सुमारास सुरेश स्थळेश्री यांच्या बागेतील विहिरीत बिबट्या पडला होता. ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले वनविभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सकाळी आठच्या सुमारास पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ग्रामस्थांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

ग्रामस्थांच्या सहकार्याने च्या सुरक्षित सुटकेसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. पहिल्या वेळी  बिबट्याने पिंजऱ्याच्या दरवाजाची दोरी तोडल्याने पिंजऱ्याचा दरवाजा थेट विहिरीत खोल पडला. यादरम्यान बिबट्या पिंजऱ्यावर चढून वरती उडी मारण्याचा प्रयत्न करत होता मात्र सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण विहिरीला वरून जाळी लावण्यात आली होती.

ग्रामस्थांच्या सहकार्याने पाण्यात पडलेला दरवाजा बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा पिंजरा पाण्यात सोडण्यात आला . अनेक प्रयत्न नंतर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केल्यानंतर त्याला दहाच्या आसपास सुरक्षितपणे विहिरी बाहेर काढण्यात आले.

विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बघ्यांनी गर्दी केली होती. यामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या. सागरी पोलीस ठाणे नाट्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. वनविभागाचे अधिकारी पोलीस कर्मचारी आणि काही जबाबदार नागरिक वारंवार उपस्थितांना त्याचे आव्हान करत होते.

बिबट्याला पिंजऱ्यातून सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे आणि त्यानंतर त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.