नाट्य महोत्सवांमुळे कोकणची लोककला जिवंत राहते : विशाल परब

खानोलीत पौराणिक नाट्य महोत्सवाचं उदघाटन
Edited by: दिपेश परब
Published on: April 23, 2026 15:04 PM
views 10  views

वेंगुर्ले : खानोली येथे आयोजित पौराणिक नाट्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारंपरिक वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले असून, नाट्यप्रेमी आणि कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून युवा नेते विशाल परब, प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, साईप्रसाद नाईक, शरद चव्हाण , सुनिल मयेकर , संतोष सनगरे आणि बुवा भालचंद्र केळुसकर , सरपंच सुभाष खानोलकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विशाल परब यांनी आपल्या मनोगतातून पौराणिक नाट्यकलेचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. “दशावतार आणि पौराणिक नाट्य ही आपली समृद्ध परंपरा आहे. अशा महोत्सवांमुळे ही कला जिवंत राहते आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचते,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ग्रामीण भागात अशा उपक्रमांचे आयोजन होणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्घाटनानंतर सादर करण्यात आलेल्या पौराणिक नाट्यप्रयोगांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कलाकारांच्या दमदार अभिनय, आकर्षक वेशभूषा, प्रभावी नेपथ्य आणि पार्श्वसंगीतामुळे नाटकांना रंगत आली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. महोत्सवाच्या आयोजनात स्थानिक ग्रामस्थ, युवक मंडळे आणि कला प्रेमींनी विशेष परिश्रम घेतले असून, संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. येत्या काही दिवसांत विविध पौराणिक कथांवर आधारित नाट्यप्रयोग सादर होणार असल्याने खानोलीत सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

हा महोत्सव स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच पारंपरिक लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी विशाल परब यांनी व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर आपण प्रत्येक वेळी आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा वैभव खानोलकर यांनी केले . यावेळी अण्णा खानोलकर, विद्याधर प्रभु, मनोहर खानोलकर उपस्थित होते.