
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील पांडवकालीन देवस्थानसाठी प्रसिद्ध असलेल्या कसईनाथ डोंगराचा वाघबीळ येथील काही भागात मोठे दगड माती कोसळल्याची ती घटना खरी आहे. मोठे दगड कोसळल्याने मोठा आवाज झाला होता. त्यामुळे जंगली प्राणी, पक्षी ओरडले होते.
अधिक माहिती अशी की काल रविवारी सायंकाळी कसईनाथ डोंगराचा गिरोडे गावाकडचा काही भाग मोठा आवाज करत कोसळला होता. त्यामुळे जंगली प्राणी माकड, मोर हे मोठमोठ्याने ओरडत होते. अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याची आज सोमवारी सकाळी सत्यता आम्ही जाणून घेतली गिरोडे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गिरोडे गावात जाऊन चौकशी केली असता रविवारी साधारण 6.30 वाजण्याच्या सुमारास कसईनाथ डोंगरावर वाघबीळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाचा काही भाग म्हणजे मोठे दगड, झाडे, माती मोठ्याने आवाज करत कोसळले. या मोठ्या आवाजाने येथील मोर, माकड हे मोठ्याने ओरडत होते, असे गिरोडे गावातील ग्रामस्थांनी सांगितले. कोसळलेल्या भागामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.