जीवनात संगीत कलेला फार मोठं महत्व : संदीप देसाई

सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंचाच्या हिंदुस्थानी खुल्या सुगम संगीत गायन स्पर्धेचं शानदार उद्घाटन सिंधुदुर्ग व गोव्यातून ७० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
Edited by:
Published on: March 18, 2024 06:38 AM
views 125  views

दोडामार्ग :  संगीत ही एक अतिप्राचीन कला आहे. आपल्या संस्कृतीमध्येही  संगीताला खुप मोठी प्राचीन परंपरा आहे. संगीत ऐकल्यान माणसाचं मन अगदी प्रसन्न होते. म्हणूनच जीवनात संगीत कलेला फार मोठं महत्व आहे.  या कलेला चालना देण्यासाठी आणि तळकोकणातील गायन क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना मोठ व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंचाने हाती घेतलेला उपक्रम कोकणच्या समृध्द संस्कृती व परंपरेला चालना देणारा आहे असे गौरोद्गार दैनिक कोकणसादचे संपादक तथा दोडामार्ग पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई यांनी काढले. 

झरेबांबर येथे सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोक कला मंचाने प्रथमच आयोजित केलेल्या हिंदुस्थानी खुल्या सुगम संगीत गायन स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  या स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर विश्वकर्मा समाज मंडळाचे अध्यक्ष नारायण सुतार,ज्येष्ठ संगीत कलाकार संतोष भिसे, एड. राहुल जाधव व या मंचाचे अध्यक्ष शंकर जाधव, महादेव सुतार,सचिव सागर नाईक,सहसचिव विलास आईर, खजिनदार महेश पारधी, सल्लागार प्रकाश वर्णेकर, संजय सुतार,कार्याध्यक्ष संजय गवस, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख देविदास सुतार, सदस्य भगवान नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी अधिक बोलताना श्री. देसाई म्हणाले की, तळकोकणात सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंचाने सर्व क्षेत्रातील कलाकारांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. श्री. जाधव व त्यांच्या टीमचे यासाठीनकौतुक केले पाहिजे.  सिंधुदुर्ग जिल्हा हा खऱ्या अर्थाने कलाकारांची खाण आहे. येथील विविध लोककला व संस्कृती जगभरातील पर्यटकांना कुतूहल वाटतात. या लोककलाच कोकणच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा असून हा वारसा जपण्यासाठी साऱ्यांनी सांघिक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत व्यक्त करत लोककला मंचाच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

तर उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले बाबा टोपले यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. दोडामार्ग तालुक्यात असे कार्यक्रम झाले पाहिजेत. शालेय जीवनात आपल्यातील विविध कला आपण जोपासत असतो. मात्र पुढे कामाच्या व्यापात आपण आपल्या करिअरच्या मागे लागतो. मात्र संगीत जीवनात समाधान देणारी फार मोठी कला आहे. आणि त्यासाठी जिल्ह्यातून आणि कोकणातून मी असलेला प्रतिसाद हा आशादायी असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. ॲड. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केलं. तर शंकर जाधव यांनी या कार्यक्रम आयोजन मागचा उद्देश सांगत उपस्थितांचे व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या टीमने दिलेल्या सहकार्य बद्दल आभार मानले. यावेळी सिंधुदुर्ग व गोवा राज्यातून ७० हून अधिक संगीत गायक स्पर्धक सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून गोव्यातून संगीत शिक्षक सुदन फडते, व  सौ. प्रीती कर्पे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पारधी यांनी केले तर उपस्थित मान्यवर, स्पर्धक त्यांच्या समावेश आलेले माता-पालक,शिक्षक यांचे आभार अध्यक्ष शंकर जाधव यांनी मानले 

लोककला मंचचे टीमवर्क प्रेरणादायी

दोडामार्ग तालुक्यात विविध कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांनी एकत्र येत सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंचची निर्मिती झाली आहे. पत्रकार शंकर मधुकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष महादेव सुतार, सचिव सागर नाईक सहसचिव विलास आईर, खजिनदार महेश पारधी, सल्लागार प्रकाश वर्णेकर, संजय सुतार, कार्याध्यक्ष संजय गवस, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख देविदास सुतार सात संगत बबन आरोंदेकर, गणू कांबळे यांची टीम जिल्ह्यातील सर्व लोककला आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी करत असलेली मेहनत त्यांचे टीम वर्क अधोरेखित करत आहे. नुकताच या टीमने तालुक्यातील विविध कलाकारांच्या संचातून लोककलांचा जागर करणारा लोकोत्सव यशस्वीरित्या पार पाडला होता.