
दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित केलेल्या शिबिरात दिव्यांग बांधवांना उन्हात उभे राहून हेळसांड झाली. ना पिण्याच्या पाण्याची सोय ना बसण्याची सोय, ग्रामीण रुग्णालयाच्या या आयोजनावर दिव्यांग संघटन अध्यक्ष साबाजी सावंत व सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक तसेच इतरांनी तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
दोडामार्ग तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांचे ऑनलाइन प्रमाणपत्र नाही अशाना यूडीआयडी कार्ड काढण्यासाठी तसेच दिव्यांगांची पडताळणी करणे यासाठी शुक्रवारी १४ नोव्हेंबर शिबिर आयोजित करण्याचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आदेश पारित केला होता. तसे पत्र देखील प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितींना प्राप्त झाले. त्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला पत्र काढून ऑनलाइन प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड व पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या शिबिराचे आयोज दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले होते. या शिबिरासाठी शुक्रवारी तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संखेने उपस्थित राहिले होते. नियोजित वेळेत ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाची टीम दाखल झाली. परंतु, अपुऱ्या नियोजना अभावी दिव्यांग बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागला. ग्रामीण रुग्णालयाने केलेल्या ठिसाळ नियोजनाबाबत दिव्यांग बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांना बसण्याची व्यवस्थ करण्यात आली नाही. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. रुग्णालयातील अपुऱ्या जागेमुळे उपस्थित दिव्यांगाना रुग्णालयाबाहेर उन्हात ताटकळत रहावे लागले. समोरच्या पटांगणात मंडप उभारून बसण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, रुग्णालयाकडून तशी व्यवस्था करण्यात आली नसल्याने तळपत्या उन्हात उभे राहण्याची नामुष्की दिव्यांग बांधवांवर ओढवली. शिबिराचे सु नियोजित आयोजन करता येत नसेल तर आम्हां दिव्यांगाना त्रासदायक ठरणारी अशी शिबिरे राबवू नको. अश्या प्रकारे संतप्त प्रतिक्रिया दिव्यांग बांधवांनी अधिकाऱ्यावर व्यक्त केली. यावेळी दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष साबाजी सावंत व सामाजिक कार्यकर्ते यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
दिव्यांगाना झालेला त्रास व ठिसाळ नियोजनाबाबत साबाजी सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त करत रुग्णालया च्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फेरी झाडल्या. गेल्या पंधरा दिवसापासून कागदोपत्री घोडे नाचवून जे शिबिर आयोजित करण्यात आले. ते फक्त दिखाऊ पणा करण्यासाठी आहे. आरोग्य विभागाकडून एवढ्या ठिसाळ नियोजनाची अपेक्षा नव्हती. दिव्यांगा बाबत एवढा निष्काळजीपणा अधिकारी कसे काय दाखवू शकतात ? असा संतप्त सवाल करत माझ्या दिव्यांग बांधवावर झालेला त्रास मी सहन करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी अशाप्रकारे दिव्यांगांची हेळसांड करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी दिव्यांग तालुकाध्यक्ष साबाजी सावंत यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला. शिबिरात आलेल्या दिव्यांग बांधवांची ग्रामीण रुग्णालयाकडून ज्या प्रकारे हेळसांड करण्यात आली. तशी कोणाचीही होऊ नये. शासन अशी शिबिरे आयोजन करून ज्या प्रकारे बेजबाबदारपणे वागत असेल, परवड करत असेल तर अधिकारी वर्गावर कार्यवाही झाली पाहिजे. पाण्याची व्यवस्था करता येत नसेल तर शिबिरे आयोजित करू नये ? अशी प्रतिक्रिया देत सर्व बांधवांचे पाण्याची झालेली गैरसोय लक्षात घेता त्यांनी स्वखर्चाने दिव्यांगासाठी पाणी उपलब्ध करून दिले. त्यांच्यासोबत घोडगेवाडी माजी सरपंच घनश्याम करपे उपस्थित होते. त्यांनी देखील ग्रामी रुग्णालयाच्या ठिसाळ नियोजनाचा निषेध केला.










