मसुरेतील प्रभाकर माने यांच घर आगीत भस्मसात

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 02, 2024 14:45 PM
views 237  views

मालवण  : मसुरे मेढावाडी येथील प्रभाकर सदाशिव माने यांच्या घराला सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागून पूर्ण घर आगीत भस्मसात झाले. यावेळी घरात असलेले प्रभाकर  माने ( 78 वर्ष ) हे सुमारे 80 टक्के भाजल्याने त्यांचे निधन झाले असून त्यांची पत्नी शुभदा माने (70 वर्ष ) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचार  चालू आहेत.  

मुंबई येथून आलेले प्रभाकर माने हे दुपारी जेवण केल्यानंतर एका खोलीत आराम करत होते. दरम्यान शेजारील घरातील आपा सावंत यांना छपरातून धूर येत असल्याचे दिसू लागल्याने त्यांनी घरात पहिले असता दर्शनी भागातून घराच्या छपराला आग लागल्याचे दिसून आले. शेजारील महिला व ग्रामस्थांनी घरात धाव घेत त्यांना बाहेर येण्यास सांगितले. दरम्यान आगीचा जोर वाढल्याने खोलीत असलेले प्रभाकर माने बाहेर पडू शकले नाही. तर शुभदा माने या घराबाहेर पडत असताना अंगणात पडल्याने जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे उपचार करून सिटी स्कॅन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. ग्रामस्थांनी पेटत्या घरात प्रवेश करत पाहिले असता एका खोलीत भाजलेल्या अवस्थेत ते आढळून आले. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर आणत अधिक उपचारासाठी नेले. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लोमटे यांनी सांगितले.

 मालवण नगरपंचायतचा अग्निशमक बंब बोलावण्यात आल्या नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास हा बंब दाखल झाला. घराच्या छपराला आग लागल्याने बाजूच्या दोन घराना आगी मुळे धोका निर्माण झाला होता. अग्निशमक बंब आल्यानंतर आगीवार नियंत्रण मिळविण्यात यश आले. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मसुरे ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर,पोलीस विवेक फरांदे, उपसरपंच राजेश गावकर, शिवाजी परब, संग्राम प्रभूगावकर, छोटू ठाकूर, सौ लक्ष्मी पेडणेकर, डॉ विश्वास साठे, जगदीश चव्हाण, बाबू आंगणे, कोतवाल सचिन चव्हाण,  विनोद मोरे, सुदर्शन मसूरकर  यांनी पाहणी करत मदत कार्यात सहभाग घेतला.  विजवितरण कर्मचारी अमित बागवे, श्री परब यांनी दाखल होत वीज पुरवठा खंडित केला.