वैभववाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली

पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष - प्रशासानाची अनास्था जबाबदार : गुलझार काझी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 30, 2025 19:44 PM
views 456  views

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. उंबर्डे-भूतेश्वरवाडी येथील २५ वर्षीय सुंदरा शिवगण हिचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना म्हणजे “आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा आणि पालकमंत्र्यांच्या दुर्लक्ष पणाचा परिणाम आहे,असा आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुका सचिव गुलझार काझी यांनी केला आहे.

 उंबर्डे येथील तरुणीच्या मृत्यूनंतर ठाकरे शिवसेनेने तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला जबाबदार धरले आहे. याप्रकरणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर टिका केली आहे. काझी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सुंदरा शिवगण हिला काही दिवसांपासून ताप होता. तिने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. मात्र, तेथील डॉक्टरांनी योग्य निदान न करता उपचार केले आणि  पुढील उपचारासाठी  तिला रेफर केले नाही. प्रकृती आणखी बिघडल्याने तिला बुधवारी दुपारी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णवाहीका वेळेत उपलब्ध झाली नाही ,इतकेच नव्हे तर १०२ रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे सांगण्यात आले.! नातेवाईकांनी तिला अखेर खासगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. “वेळेत उपचार आणि मूलभूत आरोग्य सुविधा न मिळाल्याने निष्पाप युवतीचा जीव गेला,” अशी तीव्र टीका श्री. काझी यांनी केली.

 ते म्हणाले, तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाकडे पुरेसा औषध साठा उपलब्ध नाही. उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी संवाद साधला असता, औषधे आणि वैद्यकीय सामुग्रीचा मोठा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे एका रुग्णाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप काझी यांनी केला..

सर्पदंशासारख्या प्रकरणातही ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळत नाहीत , हा दुर्दैवाचा आणि लज्जास्पद प्रकार आहे,असे म्हटले आहे.  पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात अशा घटना घडणे म्हणजे हे मंत्र्यांचे अपयश आहे, अशी टीका काझी यांनी केली. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री काझी यांनी केली आहे.

उंबर्डे येथील सुंदरा शिवगण हिला ताप येत होता. तिने ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले होते, परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य निदान न करता उपचार केले. त्यामुळे मृत्यूप्रकरणी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची चौकशी व्हावी.त्याचसोबत उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी व्हावी. या संदर्भात ठाकरे शिवसेना आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.