पालकमंत्र्यांनी दिली जिल्हा कारागृहाला भेट..!

Edited by:
Published on: January 08, 2024 20:44 PM
views 259  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा कारागृह  येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी 6 जानेवारी रोजी भेट देऊन सुविधांची पाहणी केली.  यावेळी कारागृहात बंदिवानांना मिळणाऱ्या जेवनाची, निवासाची तसेच उपहारगृहाची पाहणी केली. कारागृहातील बंदीवानांची नियमित आरोग्य तपासणी करावी, त्यांना सकस आहार देण्यात यावा अशा सूचना कारागृह प्रशासनास देत कारागृहाच्या समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृह परिसरात बंदिवानांनी केलेल्या भाजीपाल्याच्या शेतीची पाहणी केली तसेच बंदिवानांशी संवाद देखील साधला.  

कारागृह अधीक्षक बी.एम. लटपटे यांनी पालकमंत्र्यांना कारागृहाबद्दल सविस्तर माहिती दिली. कारागृह परिसरात 1 एकरावर भाजीपाल्याची सेंद्रीय  शेती करण्यात येते.  बंदिवानांच्या आहारात देखील याच भाजीपाल्याचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृहास मंजूर झालेला शस्त्रसाठा ठेवण्याकरिता व कारागृह कर्मचारी यांच्याकरिता सुरक्षा रक्षक खोली, शस्त्रसाठा जतन करण्याकरिता शस्त्रगार व बंद्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षालय, कारागृह ते गरुड सर्कल ओरोस या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, कारागृहाच्या तटबंदीच्या आतील व बोहरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशीही मागणी श्री लटपटे यांनी पालकमंत्र्यांना केली. यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.