
सावंतवाडी : तलावाभोवतीचा पादचारी मार्ग हा मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या आणि इतर पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. पावसानं तो निसरडा झाल्याने या फुटपाथवर घसरून पडण्याचे प्रकार वाढलेत.
काल सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही जणांनाही याचा फटका बसला. आजही सकाळी दोघे-तिघे जण घसरून पडले, तर अनेक जण थोडक्यात बचावलेत. विशेषतः हॉस्पिटलमधून एसटी स्टँडकडे जाणाऱ्या बायकाही या निसरड्या फुटपाथच्या बळी ठरल्या आहेत. या वाढत्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या सावंतवाडीतील नागरिकांनी आज सकाळी साडेआठ वाजता थेट नगरपालिकेत धडक दिली. माजी नगरसेवक सुरेश भोगटे, महेश नार्वेकर, सत्यजित देशमुख, विकास नारूरकर, संदीप धारगळकर, श्री.लाखे आणि इतर नागरिकांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी धरणे धरून या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या फुटपाथवरून चालताना तोल जाऊन पडण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. यामुळे अनेकांना दुखापती झाल्या असून नागरिक भयभीत झालेत. नगरपालिकेने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन फुटपाथची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.