कणकवलीत 7 फ्लॅट फोडलेत

Edited by: साहिल बागवे
Published on: August 23, 2024 10:00 AM
views 605  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील जानवली येथील दीक्षा अपार्टमेंट आणि पीजी ग्रुप या दोन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी मध्यरात्री धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही बिल्डिंगमध्ये एकूण सात फ्लॅट चोरांनी फोडले आहेत. मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या धाडसी चोरीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत वृत्त असे की, या सात फ्लॅटमध्ये सावंत यांच्या मालकीच्या एका किराणा दुकानाचा समावेश आहे. गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा ही आधार या चोरट्याने घेतल्याने नेहमी रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत गजबजलेली असलेली ही वसाहत गुरुवारी रात्री लवकर झोपी गेल्यामुळे त्याचा फायदा ही चोरट्याने उठवला आहे.

घटनेची माहिती समजताच शुक्रवारी सकाळी कणकवली पोलिसांनी वेगाने तपास करण्यास सुरुवात केली असून नजीकच्या ब्रह्माकुमारी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही वरून मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरटे या रस्त्यावरून जात असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे रामचंद्र शेळके व अन्य पोलिसांकडून सुरू आहे.

तब्बल १४ तोळे दागिने लांबविले 

कणकवलीतील एस एम हायस्कूल मध्ये कार्यरत असलेले शिक्षक विजय सातपुते यांच्या मालकीच्या फ्लॅट मधील तब्बल १४ तोळे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे चोरी झालेल्या फ्लॅटच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये सातपुते हे राहत होते. त्या ठिकाणी त्यांचे दोन फ्लॅट असून त्यांच्या बंद फ्लॅटमध्ये असलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

शान पथकाला प्राचारण

दीक्षा पार्क आणि परिसरात झालेल्या या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी क्षणपथकाला प्राचारण करण्यात आले होते. पथकाकडून तपासणी करण्यात येत होती. या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे.