भाजप-शिंदे गटात पहिली ठिंणगी ? ; युतीत 'नॉटवेल' !

खरेदी-विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी अभिमन्यू लोंढे
Edited by: विनायक गावस
Published on: January 13, 2023 15:16 PM
views 549  views

सावंतवाडी :  ज्या सावंतवाडी खरेदी-विक्री संघात श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट ) यांच्यात कोकणातील पहिली युती झाली त्याच खरेदी- विक्री संघाच्या तज्ञ संचालक निवडीवेळी दोन्ही पक्षांत उभी फूट पडली आहे. खरेदी-विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. भाजपकडून २ व तर शिंदे गटाकडून ३ जणांची तज्ञ संचालक पदासाठी नाव सुचविली होती. यात 15 संचालकांनी आपलं मत नोंदवले. या निवडीत 9 विरूद्ध 6 असं मतदान होत भाजप गट शिंदे गटावर सरस ठरला. तज्ञ संचालकपदी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन अभिमन्यू लोंढे, माजी सभापती गुरूनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली. यूतीत फुट पडल्यानं शिंदे गटाला तज्ञ संचालक पदापासून वंचित राहावं लागलं. तर भाजपनं सुचविलेल्या दोन्ही उमेदवारांची तज्ञ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

नवनिर्वाचित दोन्ही तज्ञ संचालकांना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शुभेच्छा देत गौरव केला.यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, खरेदी-विक्री चेअरमन प्रमोद गावडे, मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रविण देसाई आदी उपस्थित होते. 


सावंतवाडी येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमन प्रमोद गावडे, व्हा. चेअरमन रघुनाथ रेडकर अनारोजीन लोबो, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, प्रमोद सावंत, शशिकांत गावडे, ज्ञानेश परब, विनायक राऊळ, रेश्मा निर्गुण, नारायण हिराप, भगवान जाधव आदींसह  खरेदी-विक्री संघाचे श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल युतीचे सदस्य उपस्थित होते. 


दरम्यान, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते शिक्षणमंत्री दीपक केसरकर एकीकडे युतीसाठी आग्रही असताना सहकारात संचालक निवडीत पडलेली फूट पाहता युतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्री संघात पडलेली ही ठिणगी आणखीन पेटणार की वरिष्ठांच्या आदेशानं क्षमणार ? हे लवकरच स्पष्ट होईल.