हसतमुख, मदतीला धावणाऱ्या राकेश बोंद्रेचा अंत

ओरोस - बुद्रुकमध्ये हळहळ
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 04, 2026 17:57 PM
views 126  views

सिंधुदुर्गनगरी : हसतमुख स्वभाव, प्रत्येकांच्या मदतीला तत्पर धावून जाणारा आणि सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारा राकेश रविंद्र बोंद्रे (वय ३०, रा. ओरोस बुद्रुक) या तरुणाने आपल्या राहत्या घरी दुपारी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे. आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

        मिळालेल्या माहितीनुसार, राकेश दुपारी आपली वैयक्तिक कामे आटोपून मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यानंतर तो घरी गेला. काही वेळाने त्याची आई घरी परतली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलाची अवस्था पाहताच आईने टाहो फोडला. तिचा आक्रोश ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घराकडे धाव घेतली.

      नागरिकांच्या मदतीने राकेशला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. ही बातमी समजताच वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या सर्वांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची प्रचिती यावेळी आली.

      राकेशच्या अचानक जाण्याने ओरोस बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे तो सर्वांचा लाडका होता. अशा उमद्या तरुणाच्या अकाली निधनाने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलिस करीत आहेत.