हत्तींनी एका रात्रीत बागायती केली उद्धवस्त ; महिलेला बसला धक्का

Edited by: लवू परब
Published on: June 26, 2024 05:56 AM
views 281  views

दोडामार्ग : दिवस रात्र रक्ताच पाणी करून उभी केलेली नारळ-सुपारीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्धवस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरी महिला बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. शुभांगी पांडुरंग गवस  -६० असे तिचे नाव असून तिला उपचारासाठी साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. हत्तींच्या पायदळी संसारची धूळधाण होताना पाहून तिला जबर धक्का बसल्याने तिची ही अवस्था झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

रानटी हत्ती आता शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहेत. पूर्वी जंगलात राहणारे हत्ती आता तर थेट लोकवस्तीत येऊन धुडगुस घालत आहेत. मोर्ले , केर , घोडगेवाडी , तेरवण - मेढे आदी परिसरात सध्या या हत्तींचा वावर आहे. या भागातील शेतकऱ्यांनि फुलविलेल्या केळी, सुपारी आणि माडांच्या बागा उध्वस्त करण्याचे काम हत्ती करत आहेत. त्यामुळे इथला बळीराजा देशोधडीला लागला आहे. एक माड वर्षभर एका माणसाला पोसतो एवढे उत्पन्न त्याच्याकडून मिळते असे बोलले जाते. म्हणूनच तर शेतकरी कल्पवृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. मात्र दिवस रात्र घाम गाळून पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलेल्या  कल्पवृक्षाच्या बागा स्वतःच्या डोळ्यादेखत हत्तींकडून नेस्तनाबूत होताना पाहून डोळ्यातले अश्रू मनगटाने पुसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. असाच एक प्रकार मंगळवारी मोर्लेत घडला. येथील शेतकरी महिला शुभांगी पांडुरंग गवस या आपल्या बागेत गेल्या होत्या. यावेळी त्यांना बागेतील माडाची झाडे हत्तींनी उन्मळून खाली पाडल्याचे व बागायतीचे नुकसान केल्याचे दिसले.यापूर्वीही या बागेत हत्तींनी धुडगूस घालून मोठे नुकसान केले होते. आता तर उरले-सुरले माड ही भुईसपाट केले. परिणामी त्यांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्या बागेतच बेशुद्ध पडल्या. त्यांना त्यांच्या सुनेने तातडीने साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे उपचार करून तिला घरी सोडण्यात आले.

हत्ती शेतकऱ्याच्या मुळावर उठले असताना निगरगठ्ठ सरकार हत्ती पकड मोहीम राबविण्यावर शिक्कामोर्तब करत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.हत्तीपकड मोहिमेसाठी सरकार आता शेतकऱ्यांचे प्राण जाण्याची वाट पाहतय का ? असा संतप्त सवालही विचारला जाऊ लागला आहे