'त्या' ग्रामपंचायतीचा उपसरपंच अपात्र

ॲड. विलास परब यांचा युक्तिवाद
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 31, 2025 11:41 AM
views 345  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा सदस्य प्रज्वल पांडुरंग वर्दम यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील निवडणूक खर्च विहित कालावधीमध्ये सादर न केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे. याबाबत साकेडी येथील सुरज सुरेश वर्दम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होत जिल्हाधिकाऱ्यानी हा निर्णय दिला आहे. अर्जदार सुरज वर्दम यांच्या वतीने ॲड. विलास परब यांनी बाजू मांडली.

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान साकेडी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार असलेल्या प्रज्वल वर्दम यांनी विहित कालावधीमध्ये निवडणुकीचा खर्च सादर केलेला नव्हता. याबाबत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 ब (1) अन्वये अर्जदार सुरज सुरेश वर्दम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीदरम्यान सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान न्यायालयीन आदेशांचे संदर्भ देत ॲड. विलास परब यांनी अर्जदार सुरज वर्दम यांचा अर्ज अमान्य करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या समोर बाजू मांडली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबतचा निर्णय देत प्रज्वल वर्दम यांना अपात्र ठरवले आहे. यामध्ये सुरज सुरेश वर्दम यांचा विवाद अर्ज मंजूर करण्यात आला असून, प्रज्वल पांडुरंग वर्दम यांना 28 ऑगस्ट 2025 या आदेशाच्या दिनांक पासून सदस्य पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. तसेच सदरचा निर्णय सर्व संबंधितांना कळवण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.